‘एफडीए’च्या दोषींवर होणार कठोर कारवाई
By admin | Published: December 24, 2014 02:24 AM2014-12-24T02:24:41+5:302014-12-24T02:24:41+5:30
राज्याच्या अन्न आणि औषधी प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी लाच प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रशासन कठोर कारवाई करील
श्रीनारायण तिवारी, मुंबई
राज्याच्या अन्न आणि औषधी प्रशासन (एफडीए) विभागाचे अधिकारी लाच प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध प्रशासन कठोर कारवाई करील, असा इशारा देण्यात आला आहे. विभागातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी विनाकारण त्रास दिल्यास विके्रत्यांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे़
एफडीएचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात त्यांनी कोणालाही लाच मागू नये व पावतीशिवाय कोणाहीकडून पैसे स्वीकारू नयेत असा सल्ला दिला आहे. यानंतरही कोणाविरुद्ध तक्रार आली तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अधिकाऱ्यांशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार करू नयेत, असेही आवाहन भापकर यांनी विक्रेत्यांना केले आहे.
डॉ. भापकर यांच्याकडून देण्यात आलेल्या महत्त्वाच्या आदेशात ‘लोकमत’च्या बातम्यांचा उल्लेख करून लाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. भापकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाने ‘लोकमत’च्या मालिकेला खूपच गांभीर्याने घेऊन त्यात उपस्थित केलेल्या मुद्यांची चौकशी केली जात आहे. चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. अन्नसुरक्षा कायद्यातील नियमांचे पालन दूध आणि मिठाईच्या व्यापाऱ्यांनी करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. छोट्या व्यापाऱ्यांना केवळ नोंदणी (रजिस्ट्रेशन) करणे आवश्यक आहे व मोठ्या व्यापाऱ्यांनी नियमांनुसार फॉर्म भरणे गरजेचे आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.