नागपुरात आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन; मराठवाड्यातही कडेकोट उपाययोजना, खान्देशातही सतर्कता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 06:43 AM2021-03-15T06:43:14+5:302021-03-15T06:44:22+5:30
कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील.
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागपुरात सोमवार, १५ मार्च ते २१ मार्चदरम्यान नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यादरम्यान पूर्णत: संचारबंदी लागू राहील. कुणालाही विनाकारण बाहेर फिरता येणार नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहील. यासाठी जिल्हा व मनपा प्रशासनासह पोलीस विभागही सज्ज झाला आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे आणि मास्क न घालता फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करतील. (Strict lockdown in Nagpur for a week from today; Strict measures in Marathwada too, vigilance in Khandesh too)
लातूर जिल्ह्यातील आठवडा बाजार बंद
लातूर : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले आहेत. दिनांक ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडा बाजार बंद राहणार आहेत. त्याचबरोबर संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
उस्मानाबादेत जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्मानाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दर रविवारी जनता कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. नागरिकांनी घरात बसणे पसंत केल्याने बाजारपेठेतील रस्ते ओस पडले होते; मात्र मुख्य रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कायम होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी रविवारी शहरात फिरुन दुकाने न उघडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. या कर्फ्यूमधून दवाखाने, औषध दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले होते.
जामनेरला चार दिवस जनता कर्फ्यू
जामनेर : शहरात १६ मार्चपासून चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय रविवारी तहसीलमध्ये झालेल्या बैठकीत आमदार गिरीश महाजन यांनी जाहीर केला. बंदमधून वैद्यकीय सेवा, औषधी दुकाने व दूध डेअरींना वगळण्यात आले आहे. दूधविक्री सकाळी व सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सुरू राहील, असे सांगण्यात आले.
नाशिककरांनी दाखविली स्वयंशिस्त
नाशिक: जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यावर उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. गेल्या बुधवारपासून बाजारपेठा सायंकाळी ७ वाजेनंतर बंद होत आहेत तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी दुकाने पूर्णपणे बंद ठेवली जात आहेत. नागरिकांनादेखील लॉकडाऊन नको असल्याने त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.
धुळ्यात ‘जनता कर्फ्यू’ची प्रभावी अंमलबजावणी
धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून ‘जनता कर्फ्यू’ लागू केला असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू झाली. सायंकाळी ६ नंतर शहरातील सर्वच भागात शुकशुकाट होता. बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे.