CoronaVirus: 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय; आणखी काही जिल्ह्यांची लॉकडाऊनची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:01+5:30
रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
अतुल कुलकर्णी -
मुंबई : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सध्या संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून आणखी काही जिल्हे १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात १५ मे नंतरही कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.
सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी वेळ लागणार आहे. ऑक्सिजनची उपलब्धता तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १५ मे नंतर सर्व व्यवहार सुरू केले तर साथ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आहे तशीच कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. (Strict restrictions until May 31; Decisions at the senior level; Preparations for lockdown of some more districts)
जवळपास ११ जिल्ह्यांनी १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दहापैकी नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन २२ आणि २३ मेपर्यंत कायम आहे. ज्यांची मुदत १५ मे रोजी संपत आहे, असे जिल्हेदेखील पुन्हा मुदतवाढ करण्याच्या मानसिकतेत असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कितपत असेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.
रुग्णसंख्या होतेय कमी
१ एप्रिल : ६३,२८२
१७ एप्रिल : ६७,१२३
२४ एप्रिल : ६७,१६०
१ मे : ६३,२८२
५ मे : ५७,६४०
९ मे : ४८,४०१
१५ ते ३१ मे
हा काळ महत्त्वाचा आणि कसोटीचा आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावा लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
आपल्याकडे रोज ६० ते ७० हजार रुग्ण निघत होते. त्यांची संख्या आता ४५ ते ५० हजारापर्यंत कमी झाली आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. अशावेळी लॉकडाऊन काढला किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता आणली तर केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे जैसे थे परिस्थिती ठेवण्याची मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.
- राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री
टास्क फोर्सच्या सूचना
- सरकारने नेमलेल्या टास्क फोर्ससह वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘जैसे थे परिस्थिती’ कायम ठेवावी, अशी शिफारस केल्याची सूत्रांनी माहिती दिली.
- रुग्ण कमी होत नसलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर लॉकडाऊन लावण्याचे सुचविले आहे. दूध आणि औषधाची दुकाने एवढेच चालू ठेवावे, बाकी सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.
११ जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन
राज्यातील ११ जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून, दूध आणि औषधाची दुकाने चालू ठेवावीत, बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात १० दिवस कडक लॉकडाऊन असेल.
कोल्हापूर -
दोन दिवसात कडक लॉकडाऊन केले जाईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. अहमदनगरमधील कठोर निर्बंध १५ मेपर्यंत वाढविल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.
अकाेला -
सहा दिवसासाठी कठोर निर्बंध लागू केल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. कठोर निर्बंधाचा साेमवारी पहिला दिवस हाेता. निर्बंधाची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे चौक आणि रस्ते निर्मनुष्य होते.
हे राहणार बंद : किराणा दुकाने, भाजीपाला व फळ बाजारातील मालाची खरेदी-विक्री, अंडी, मटण, चिकन व मासे विक्री