ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरची २५ गाड्यांना धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 06:42 AM2019-11-04T06:42:10+5:302019-11-04T06:42:24+5:30
कसारा घाटातील थरार : १४ जण जखमी; सात गाड्यांचे मोठे नुकसान
कसारा : नाशिकहून मुंबईच्या दिशेने सळया घेऊ न येणाऱ्या कंटेनरचे कसारा घाटातच ब्रेक निकामी झाल्याने रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विचित्र अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने घाटातील २० ते २५ गाड्यांना धडक दिली. १५ मिनिटे हा थरार सुरू होता. अखेर, मालवाहू ट्रक आणि गॅसच्या टॅँकरला धडकल्यानंतर हा कंटेनर थांबला. यामध्ये सात गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून विविध गाड्यांमधील १४ प्रवासी जखमी असून पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघातामुळे बंद पडलेली वाहतूक तीन तासांनंतर सुरू झाली; मात्र दोन्ही मार्ग जॅम झाल्याने पाच तास वाहतूककोंडी कायम होती.
अपघाताची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन टीम शहापूर, कसारा पोलीस पीक इन्फ्रा टीम महामार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अलका मोरे, अविनाश मोरे, पूजा गांगुर्डे, ऋतुजा शेळके (३), स्वरा शेळके (१), राजेंद्र घुगे, भाग्यश्री शेळके, चैताली दराडे हे गंभीर जखमी झाले आहेत. इतर जखमींची नावे समजू शकली नाहीत. अपघातानंतर कसारा घाटात वाहतूक ठप्प झाली होती. तीन तासांनंतर ही कोंडी फोडण्यात कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस.बी. महाले आणि राठोड आणि कर्मचाऱ्यांना यश आले. दरम्यान, कसारा घाटातील या भीषण अपघाताची माहिती मिळताच ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी मदतकार्यासाठी दाखल झाले होते. मदतकार्य करताना महामार्गचे काम करणाºया ठेकेदार कंपनीकडे क्रेनसह अन्य यंत्रणा नसल्याने अडथळा येत होता. अखेर, ट्रेलरमध्ये अडकलेल्या चालकांना खासगी यंत्रणा वापरून आपत्ती टीम आणि पोलीस प्रशासनाने बाहेर काढले. घाटातील सर्व गाड्या बाजूला करण्यासाठी उपलब्ध केलेल्या क्रेन जुन्या असल्याबाबतही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
...तर मोठा अनर्थ झाला असता!
ब्रेक फेल झालेल्या ट्रेलरमध्ये सळई होत्या. या ट्रेलरने अखेरीस गॅस टँकरला धडक दिली. यामध्ये गॅस लीक झाला असता तर मोठा अनर्थ ओढावला असता. तसे झाले असते तर हाहाकार उडाला असता, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रेक फेल झाल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनरने १० ते १५ गाड्यांना धडक दिली. त्यात वाहनांची अशी स्थिती झाली होती.