अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:28 AM2023-03-18T05:28:15+5:302023-03-18T05:29:29+5:30

संपामुळे नीट परीक्षार्थींचीही कोंडी.

strike for old pension hit continues due to stalling of panchnama farmers get in trouble | अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

अवकाळीने झोडपले, संपाने रडविले; पंचनामे रखडल्याने शेतकरी हवालदिल, दाखले मिळेनात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना गेल्या तीन दिवसांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. मात्र, राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर असल्याने हे पंचनामे रखडले आहेत. त्यामुळे ‘अवकाळीने झोडपले आणि संपाने रडविले’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

संपामुळे शुक्रवारी सलग चौथ्यादिवशी विविध विभागांतील शासकीय कामकाज ठप्प होते. ठिकठिकाणी संपकरी कर्मचाऱ्यांनी मोर्चे काढत निदर्शने केली. परंतु, संपामुळे सर्वसामान्यांची कामे मात्र खोळंबल्याचे पाहायला मिळाले. 

सर्व तहसील कार्यालयांतील निराधार सेल बंद असल्याने त्यांच्या निधीची मागणी शासनाकडे अद्याप पाठविण्यात आलेली नाही. संपात तलाठी सहभागी असल्याने फेरफारची कामे रखडली आहेत. उन्हाळा सुरू झाला असल्याने पाणीटंचाईचा आराखडा बनविणे आवश्यक होते, मात्र हा आराखडाही अद्याप बनविण्यात आला नाही. यामुळे त्याचा परिणाम ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर होऊ शकतो.

‘ती’चा मृतदेह दोन दिवस लटकलेलाच; संपामुळे कुणाला कळलेच नाही!

अकोला : चार वर्षांनी बाळ झालं; पण मुलगी झाली म्हणून नातेवाइकांची नाराजी... त्यात चिमुकली कमी वजनाची म्हणून त्रास सहन न झाल्याने प्रसूत मातेने सर्वोपचार रुग्णालयातच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवस हा प्रकार कुणाला कळलाच नाही, मात्र शुक्रवारी सेवेत रुजू झाल्यानंतर हा प्रकार सफाई कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आला. 

वाशिम येथील २५ वर्षीय गोदावरी खिल्लारे या महिलेचे ३ मार्च रोजी सीझर करण्यात आले अन् तिला मुलगी झाली. १५ मार्च रोजी सकाळपासूनच गोदावरी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांसोबतच रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत दिली. दोन दिवसानंतर सफाई कर्मचारी सेवेत रुजू झाले अन् वॉर्डांची स्वच्छता सुरू केली. त्यावेळी सफाई कर्मचाऱ्याला दुर्गंधी आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा तोडून उघडताच महिलेने गळफास घेतल्याचे दिसले.

संपकऱ्यांचा प्रत्येक दिवस खातोय साडेतीन हजारांपर्यंत वेतन!

राज्यभरातील १८ लाखांवर संपकऱ्यांवर वेतन कपातीची टांगती तलवार आहे. प्रत्येक दिवसाचे २ ते ४ हजारांपर्यंतची वेतन कपात होण्याची शक्यता आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी प्रशासनाकडून शिस्तभंगासह वेतन कपातीच्या नोटिसा बजावायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता संपाच्या तंबूत पगाराची आकडेमोड सुरू झाली आहे. शिपाई ते अधिकारी दर्जाच्या संपकऱ्यांचा प्रतिदिवस २ ते ४ हजार रुपयांपर्यंतच्या वेतनाची कपात होणार आहे.  

संपाच्या मंडपात धरला कर्मचाऱ्यांनी ‘शराबी’वर ठेका 

परभणी जिल्हा परिषद इमारतीसमोर सुरू असलेल्या आंदोलनाच्या मंडपात शुक्रवारी दुपारी कर्मचाऱ्यांनी साऊंड स्पीकरच्या मोठ्या आवाजात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झालेल्या ‘लोग कहते हैं मैं शराबी हूँ’ या गाण्यावर ठेका धरल्याचे पुढे आले. त्यामुळे हा संप आहे की मौजमजा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘पेन्शन नकोच...; अर्ध्या पगारावर काम करायला तयार’ 

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी जुन्या पेन्शनला विरोध करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात आम्ही अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहोत. पेन्शन नको. बेरोजगारांना रोजगार द्या, अशा आशयाच्या या पोस्टमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता नागरिकांना दसरा चौकात जमण्याचे आवाहन केले होते. ही पोस्ट वाचून चाळीसहून अधिक तरुण दसरा चौकात आले. त्यांनी मोर्चाऐवजी निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.  

जमिनींची खरेदी-विक्रीही थंडावली

संपामुळे जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहारही थंडावले आहेत. जमिनींचे सातबारा उतारे ऑनलाइन मिळत असले, तरी प्रत्यक्ष तलाठ्याकडूनच सही-शिक्क्यासह घेतले जातात. पण संपामुळे ते मिळणे मुश्किल झाले आहे. दस्त नोंदणीही ठप्प आहे.

शिकाऊ डॉक्टरांवर भार

शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका हा रुग्णसेवेला बसत आहे. बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण विभागाची जबाबदारी ही शिकाऊ डॉक्टरांवर येऊन पडली आहे. अशात रुग्णांचे हाल होत आहेत.   

दाखले, उतारे मिळवायचे कसे?

सांगली : संपाचा फटका नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचा नीट परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी डझनभर कागदपत्रे लागतात. त्यातील सरकारी दाखले मिळवण्यात संपामुळे अडचणी येत आहेत. संपामध्ये महसूल कर्मचारीही सहभागी असल्याने दाखले, उतारे मिळवायचे कसे? हा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे. 

जातीचा दाखला, आर्थिक दुर्बल प्रवर्ग यासाठीचे दाखले तलाठ्याकडून घ्यावे लागतात. पण संपामुळे ते मिळणे कठीण झाले आहे. नीट परीक्षा ७ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणीही सुरू झाली आहे. केंद्रीय स्वरुपात होणाऱ्या या परीक्षेसाठी अन्य राज्यातून नोंदणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मात्र संपामुळे नोंदणीवर परिणाम झाला आहे.

नर्सिंगच्या २०० विद्यार्थिनी देताहेत २४ तास सेवा

बीड : संपामुळे कोलमडलेली आरोग्य सेवा सदृढ करण्यासाठी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी हातभार लावला आहे. खासगी व शासकीय नर्सिंगच्या तब्बल २०० विद्यार्थिनी दिवस-रात्र रुग्णसेवा करत आहेत. उपजिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने मेट्रनसह नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी रुग्णवाहिकेत जाऊन तिची प्रसूती केली. तसेच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास महाजनवाडी येथील एका महिलेची अवघड प्रसूती सुखकर करण्यात आली.  

४ दिवसांनी उघडला शाळेचा दरवाजा

संपाच्या चौथ्या दिवशी शुक्रवारी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शाळेत रुजू झाले. शिक्षक आल्याने चार दिवसांपासून बंद असलेले शाळेचे दरवाजे उघडले. संपातून शिक्षकांनी शाळेत येऊन पालकांना फोन करून मुलांना शाळेत बोलवले. शाळा सुरू होत असल्याचे समजतात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर मुलांनी मोठा जल्लोष केला.   

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: strike for old pension hit continues due to stalling of panchnama farmers get in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.