संपाचा एपीएमसीवर परिणाम नाही , व्यवहार सुरळीत : पाच मार्केटमध्ये १७५४ ट्रक, टेंपोची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 02:39 AM2017-10-10T02:39:14+5:302017-10-10T02:39:30+5:30
जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही.
नवी मुंबई : जीएसटी व डिझेलच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ देशभरातील वाहतूकदारांनी संप पुकारला आहे. पहिल्या दिवशी आंदोलनाचा मुंबई बाजार समितीच्या व्यवहारांवर काहीही परिणाम झालेला नाही. येथील पाच मार्केटमध्ये सोमवारी ८२० ट्रक व ९३४ टेंपोची आवक झाली आहे.
आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने देशव्यापी आंदोलनाचे आवाहन केले असून, त्याला बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. संपामुळे देशाच्या कानाकोपºयातून आलेल्या वाहतूकदारांनी त्यांची वाहने एपीएमसीजवळील ट्रक टर्मिनस व बाजूच्या रोडवर उभी केली होती. नवी मुंबईमधून बाहेर राज्यात अवजड वाहने गेली नसली तरी इतर राज्यातून कृषी माल घेवून मोठ्या प्रमाणात वाहने बाजार समितीमध्ये आली आहेत. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, गुजरात व दक्षिणेकडील राज्यातून धान्य, भाजीपाल्याची आवक झाली आहे. दिवसभरामध्ये ट्रक व टेंपो मिळून तब्बल १७५४ वाहनांची नोंद झाली आहे. संपाचा काहीही परिणाम झाला नसल्याची प्रतिक्रिया बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. संप सुरूच राहिला तर मंगळवार व बुधवारी आवकवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.