संप तुमचा, छळ होतोय आमचा! शस्त्रक्रियेविनाच घरी, बहिणीने ओढले स्ट्रेचर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 05:53 AM2023-03-16T05:53:40+5:302023-03-16T05:54:10+5:30

कर्मचारी संपावर असल्याने राज्यभरात सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः छळ सुरू आहे. विशेषतः आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

strike of ops and common man being harassed patient get back home without surgery | संप तुमचा, छळ होतोय आमचा! शस्त्रक्रियेविनाच घरी, बहिणीने ओढले स्ट्रेचर

संप तुमचा, छळ होतोय आमचा! शस्त्रक्रियेविनाच घरी, बहिणीने ओढले स्ट्रेचर

googlenewsNext

कर्मचारी संपावर असल्याने राज्यभरात सर्वसामान्य नागरिकांचा अक्षरशः छळ सुरू आहे. विशेषतः आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अनेक रुग्णालयांमधून रुग्णांना विनाउपचार परत जावे लागत आहे. काही ठिकाणी शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. एकीकडे ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे शासकीय कार्यालये ओस पडल्याने प्रशासकीय कामेही बारगळली आहेत. या हालअपेष्टांचे आणि संपाचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. या संपावर तोडगा कधी निघणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : एक महिला स्वत: स्ट्रेचर ढकलत वाॅर्डात जाते. वाॅर्डातील एका खाटेवर असलेल्या भावाला स्ट्रेचरवरून घेऊन त्या रुग्णालयाबाहेर पडतात. परिचारिका, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शस्त्रक्रियेशिवाय घरी जाण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. तर शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत इतर रुग्णांचीही वाॅर्डात सुरू असलेली तगमग बुधवारी येथील घाटी रुग्णालयात पाहायला मिळाली.

परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशी संप कायम राहिला. ओपीडी बंद असली तरी दाखल झालेल्या रुग्णांचेही हाल सुरू होते. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया वगळता दुसऱ्या दिवशीही नियोजित शस्त्रक्रिया ठप्प राहिल्या. त्यामुळे विविध तपासण्या करून शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्ण, नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

म्हणे संप संपल्यानंतर शस्त्रक्रिया

मणक्याच्या नसेची मंगळवारी शस्त्रक्रिया होणार होती; परंतु ती झाली नाही. संप मिटेल तेव्हाच शस्त्रक्रिया होईल, असे सांगण्यात आले. तोपर्यंत घाटीत थांबणार आहे, असे खुलताबाद येथील ईसा खान यांनी सांगितले.

१५ दिवसांनी परत येणार

वसई (सोयगाव) येथील अमोल वाघ याच्या पायाची शस्त्रक्रिया बुधवारी होणार होती, परंतु झाली नाही. त्यामुळे परत जात असून, १५ दिवसांनंतर परत येऊ, असे अमोलने सांगितले. अमोलला घेऊन जाण्यासाठी त्याची बहीण शीतल सपकाळ यांनी स्वत: स्ट्रेचर आणले व स्वत: स्ट्रेचर ओढत त्या बाहेर पडल्या.

अधिष्ठाता म्हणाले...

अधिष्ठाता डाॅ. संजय राठोड म्हणाले, संपाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी स्वरूपात २० परिचारिका आणि २० चतुर्थश्रेणी कर्मचारी घेण्यात येणार आहेत. पहिल्या दिवशी संपात सहभागी झालेले कंत्राटी कर्मचारी बुधवारी कामावर परतले आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

लांबतेय शस्त्रक्रिया 

पिंपरी (गंगापूर) येथील गोकुळ बाराहाते म्हणाले, दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. १ मार्च रोजी घाटीत दाखल झालो. बुधवारी शस्त्रक्रिया होईल, असे सांगितले होते, अजून वाट पहातोय.

रुग्णांसाठी धावून आले ‘नर्सिंग’चे प्रशिक्षित विद्यार्थी!

लातूर : जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी राज्य कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिका व कर्मचारी संघटना दुसऱ्या दिवशीही सहभागी होत्या. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आरोग्य सेवेवर काहीसा प्रभाव झाला आहे. दरम्यान, तीन नर्सिंग महाविद्यालयांचे प्रशिक्षित विद्यार्थी रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी धावून आल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. 

आंदोलनात बुधवारी वैद्यकीय महाविद्यालयातील २७, तर रुग्णालयातील ४४७ परिचारिक, तंत्रज्ञ सहभागी झाले आहेत.
संपामुळे रुग्णालय प्रशासनाने नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया थांबविल्या आहेत. दरम्यान, बुधवारी तीन नैसर्गिक प्रसूती, दोन सीझेरिअन झाले. याशिवाय दोन मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मंगळवारी ९ सिझेरियन, चार मोठ्या शस्त्रक्रिया आणि १४ नेत्र शस्त्रक्रिया झाल्या होत्या, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली.

जिल्हा परिषदेतील अडीच हजार कर्मचारी संपावर...

जिल्हा परिषदेंतर्गत एकूण ८ हजार ७९८ कर्मचारी आहेत. त्यापैकी २४२ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. ६,१६६ कर्मचारी कार्यालयात उपस्थित असून, २ हजार ३९० कर्मचारी संपात आहेत.  या संपात जिल्हा परिषद अभियंता संघटना सहभागी झाली आहे. त्यामुळे कार्यालय ओस पडल्यासारखे 
दिसत होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: strike of ops and common man being harassed patient get back home without surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.