अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संघटनांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 08:14 PM2023-12-14T20:14:41+5:302023-12-14T20:16:16+5:30

State Govt Employees Strike Called Off: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर निवेदन केल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.

strike of state govt employees is called off decision after cm eknath shinde assurance | अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संघटनांचा निर्णय

अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संघटनांचा निर्णय

State Govt Employees Strike Called Off: जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक ठिकाणी निदर्शने केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत निवेदन देत आश्वासन दिले. यावेळी संप मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आता सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. 

कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात घोषणा करावी, अशी मागणी केली होती. तसेच संप स्थगित करण्यास नकार दिला होता. गुरुवारी राज्यभरातील १७ लाख कर्मचारी संपावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जुन्या पेन्शनबाबत निवेदन केल्यानंतर कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीची बैठक झाली. त्यानंतर हा संप स्थगित झाल्याची घोषणा करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारची भूमिका मांडली असून यासंदर्भातील अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

समितीचा अहवाल प्राप्त झाला

राज्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले असून मुख्य सचिवांमार्फत त्याबाबतचे मत शासनाला सादर करण्यात येईल. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. शासनाला प्राप्त झालेला अहवाल व त्यावरील चर्चा आणि अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. त्यामुळे या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. यावेळी संप मागे घेण्याचे आवाहनही केले होते.

सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत

राज्यातील राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी समन्वय संघटनांच्या विविध मागण्यांसदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोधकुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकारी,कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या, त्यावर महत्त्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवेदनात म्हटले.

राज्य शासनाने महत्त्वाचे पाच निर्णय घेतले आहेत

संघटनांच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्त्वाचे पाच निर्णय घेतले आहेत. त्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की, दिनांक ३१ मे २००५ पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना म.ना.से. (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असून त्याचा लाभ सुमारे २६ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच ८० वर्षांवरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे, सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे, निवृत्तीवेतन, अंशराशीकरण पुनर्रस्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवाप्रवेश नियमांबाबत बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्यात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे. यामध्ये समितीने सुचविलेल्या तरतुदी लागू करण्याकरिता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे. हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, आणि सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे. हे दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करुन, आपले मत मुख्य सचिव यांच्यामार्फत शासनास सादर करतील. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल. सदर अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.
 

Web Title: strike of state govt employees is called off decision after cm eknath shinde assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.