पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये धक्काबुक्की

By admin | Published: August 30, 2016 11:37 PM2016-08-30T23:37:34+5:302016-08-30T23:37:34+5:30

वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला.

Strike in police and autorickshaw | पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये धक्काबुक्की

पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये धक्काबुक्की

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 30 - वाहतूक पोलीस आणि आॅटोचालकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे रेल्वेस्थानक परिसरात आज सकाळी प्रचंड तणाव निर्माण झाला. सीताबर्डी ठाण्यात दोन्हीकडून आरोप प्रत्यारोप आणि तक्रारीचा पवित्रा घेतला गेला. नंतर मात्र वरिष्ठ अधिकारी आणि आॅटो युनियनच्या नेत्यांनी समंजसपणा दाखवल्याने प्रकरण निवळले.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सोमवारी सायंकाळी वाहतूक शाखेच्या अधिका-यांना उपराजधानीतील विस्कळीत वाहतूक रस्त्यावर आणण्याचे तसेच संबंधित प्रशासनाला रस्त्यावरचे अतिक्रमण हटविण्याचे कडक शब्दात निर्देश दिले. या पार्श्वभूमीवर, वाहतूक शाखेतर्फे मंगळवारी सकाळपासून शहरातील विविध भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर धडक कारवाईची मोहिम पोलिसांनी सुरू केली.

रेल्वेस्थानकासमोरच्या जयस्तंभ चौकात अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती. त्यामुळे या भागात घुटमळणा-या आॅटोचालकांनाही हुसकावले जात होते. तेवढ्यात प्री पेड आॅटोचालक संघटनेचे पदाधिकारी अल्ताफ अंसारी आॅटो घेऊन चौकातून जात होते. पेट्रोल कमी झाल्यामुळे (रिजर्व लागल्यामुळे) चौकात आॅटो बंद पडला. ते माहित नसल्याने आॅटोचालकांना तेथून दूर करीत असलेले वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई मुकेश कनाटे यांनी दोन - तीन वेळा त्यांना तेथून लवकर निघा, लवकर निघा, असे आवाज दिले. यातून कनाटे आणि अंसारी यांच्यात बाचाबाची आणि नंतर धक्काबुक्की झाली. ते पाहून अन्य आॅटोचालकांनी तेथे गोंधळ घालत रस्ता रोको सुरू केला. ही माहिती कळताच राष्ट्रवादी आॅटो यूनियनचे अध्यक्ष तसेच राकांपाचे माजी शहराध्यक्ष अजय पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, अन्य एका संघटनेचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्यासह मोठ्या संख्येत आॅटोचालकांनी सीताबर्डी ठाण्यात धाव घेतली.

कर्तव्यावर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ करून धमकावणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली अंसारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा पोलिसांनी घेतला. तर, विनाकारण मारहाण करून धमकी दिल्याचा आरोप करीत कनाटेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आॅटोचालक संघटनांच्या नेत्यांनी लावून धरली. दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप झाल्याने ठाण्यातील वातावरण तणावपूर्ण बनले. शेवटी ठाणेदार सत्यवीर बंडीवार आणि अजय पाटील यांनी दोन्हीकडील मंडळींना शांत केले. दोघांनीही एकमेकांशी हातमिळवत कोणतीही तक्रार न देण्याचा निर्णय घेतल्याने प्रकरण शांत झाले.

सोमवारी सायंकाळी पत्रकारांनी शहरातील बेशिस्त आॅटोचालक आणि बिघडलेल्या वाहतूकीच्या मुद्याची पोलीस आयुक्तांना माहिती दिली. आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी त्याची दखल घेत तासाभरानंतरच कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, शहरात विना सायलेंसरच्या बुलेट चालवून फटाके फोडणा-या बुलेटचालकांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला. अनेक बुलेट चालकांची तपासणी करतानाच वाहतूक पोलिसांनी १२ बुलेट ताब्यातही घेतल्या. मंगळवारी सकाळपासून १०० पेक्षा जास्त बेशिस्त वाहनचालक, आॅटो आणि स्कूल बसचालकांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Strike in police and autorickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.