रिक्षाचालक उद्यापासून संपावर
By admin | Published: August 30, 2016 11:33 PM2016-08-30T23:33:19+5:302016-08-30T23:33:19+5:30
रिक्षा चालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून ३१ आॅगस्ट रोजी एक दिवसीय संप
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - ओला, उबेर यासह अॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी आणि तीन वर्ष झालेल्या लायसन्सधारक रिक्षा चालकांना बॅज देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून ३१ आॅगस्ट रोजी एक दिवसीय संप पुकारण्यात आला आहे.
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, सातारा, लातूर, नांदेड येथे रिक्षा बंद ठेवतानाच चालकांकडून निदर्शनेही केली जातील. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. ओला, उबेरसह खाजगी टॅक्सी कंपन्यांवर निर्बंध आणावेत या मागणीसाठी २९ आॅगस्टपासून जय भगवान महासंघ आणि स्वाभिमान टॅक्सी युनियनकडून बेमुदत संपाची हाक देण्यात आली होती.
मात्र १ सप्टेंबर रोजी परिवहन मंत्री यांनी चर्चेसाठी बोलावल्याने टॅक्सी संप मागे घेण्यात आला. मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून मात्र आपल्या विविध मागण्यांसाठी ३१ आॅगस्ट रोजी संपाची हाक देण्यात आली होती. याबाबत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की,मुंबईत पूर्णपणे रिक्षा बंद ठेवल्या जातील. त्याचबरोबर पुणे,पिंपरी-चिंचवड, नागपूर येथेही परिणाम जाणवेल. तर अन्य शहरात निदर्शने केली जातील. आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार न केल्यास गणेशोत्सवानंतर बेमुदत संप पुकारु. मागण्याचे निवेदन १ बुधवारी दुपारी परिवहन आयुक्त यांना सादर केले जाईल, असे राव म्हणाले.
मुंबईत होणाऱ्या संपात १ लाख ४ हजार रिक्षा सामिल होतील. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी परिवहन विभागाकडून पर्यायी वाहतूक व्यवस्था सज्ज ठेवली आहे. मालवाहू वाहने तसेच इतर प्रवासी वाहने जसे बस व इत्यादीमधून बंद कालावधीत प्रवासी वाहून नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसेसही आवश्यक्तेनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली. ठाणे, कल्याण,डोंबिवली, नवी मुंबईतील रिक्षांचा या संपात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.