एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:17 AM2022-01-18T08:17:45+5:302022-01-18T08:18:23+5:30
एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार
मुंबई : गेले दोन महिन्यांहून अधिक काळ विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप मुंबईच्या कामगार न्यायालयाने बेकादा ठरवला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा ठरविण्यास महामंडळाने राज्यभरातील कामगार न्यायालयात तक्रार दाखल केल्या आहेत. यासंदर्भात मुंबईच्या कामगार न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. यात न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवला. या निर्णयामुळे महामंडळाला मोठा दिलासा मिळाला असून प्रशासनाने आतापर्यंत कामगारांवर केलेली कारवाई वैध ठरणार आहेत. तसेच या कारवाया मागे घेण्याचा त्यांना आता अधिकारच राहिलेला नाही. कामगार न्यायालयात एसटी महामंडळाच्यावतीने ॲड. गुरुनाथ नाईक यांनी बाजू मांडली.
२५० आगारांपैकी २२६ सुरू
सोमवारी एकूण २६६१९ कर्मचारी कामावर हजर होते. सुरू आगाराच्या संख्येत वाढ झाली असून २५० आगारांपैकी २२६ सुरू झाले आहेत. तर महामंडळाने सोमवारी ३०४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. तर आतापर्यंत ११०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ६०२९ झाली.