राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन; कोलकात्यातील घटनेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:34 AM2024-08-13T06:34:38+5:302024-08-13T06:35:48+5:30

फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

Strike strike of resident doctors in the state from today; Protests against the incident in Kolkata | राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन; कोलकात्यातील घटनेचा निषेध

राज्यातील निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन; कोलकात्यातील घटनेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर आज, मंगळवारपासून  कोणतेही नियमित काम करणार नसल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) संघटनेने निवेदनाद्वारे कळविले आहे. या काळात ‘अत्यावश्यक सेवा’ मात्र सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोरडा) या राष्ट्रीय पातळीवरील  निवासी डॉक्टरांच्या संघटनेनेसुद्धा सर्व निवासी डॉक्टरांना निवडक सेवा बंद करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील निवासी डॉक्टर संघटनेने आणि राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांत काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांनी त्यांचा निर्णय जाहीर केला. हे ‘काम बंद आंदोलन’ मागण्या पूर्ण होईपर्यंत असून अनिश्चित कालावधीसाठी असल्याचे सांगण्यात येत आहे. वैद्यकीय वर्तुळात कोलकाता येथील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.     

शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर हा त्या ठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्याशिवाय रुग्णालयाचे कामकाज सुरळीतपणे चालूच शकत नाही, याची कल्पना सरकारला आणि प्रशासनाला व्यवस्थित आहे तरीही त्यांच्या अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत असते. ज्या ठिकाणी निवासी डॉक्टर काम करतात त्या ठिकाणचे काम बंद असल्याने याचा रुग्णांना मोठा फटका बसू शकतो.  राज्यभरातून मुंबई महापालिकेच्या आणि सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार करण्यासाठी येत असतात.

वरिष्ठ डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, या निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे अनेक नियोजित शस्त्रकिया रद्द कराव्या लागण्याची शक्यता आहे तसेच नियोजित शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना दाखल करून घेतले जाणार नाही. तसेच काही रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवेची आवश्यकता नसेल अशा रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे तसेच सर्व अध्यापक वर्गाला बाह्यरुग्ण विभाग आणि रुग्ण दाखल असलेल्या रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या रुग्णालयांना बसणार फटका

  • जे. जे. समूह रुग्णालये (जी टी, कामा आणि सेंट जॉर्जेस) 
  • केइएम रुग्णालय 
  • सायन रुग्णालय 
  • नायर रुग्णालय 
  • कूपर रुग्णालय


आमची संघटना निवासी डॉक्टरांच्या न्याय हक्कासाठी आहे. त्यामुळे देशातील एखाद्या निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केली गेली असेल तर त्याचा निषेध करणे गरजेचे आहे. तसेच अशा घटना घडू नयेत यासाठी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक असावेत, अशी मागणी आम्ही प्रशासनाकडे केली आहे.  जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे.
- डॉ प्रतीक देबाजे, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड

  • काय आहेत मागण्या?
  1. केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत कोलकाता निवासी डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी. 
  2. संपकरी निवासी डॉक्टरांचा पोलिसांनी जाच करू नये.  
  3. तज्ज्ञांची समिती स्थापन करून केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी.
  4. वसतिगृहाची व्यवस्था करून ड्युटीवरील डॉक्टरांसाठी चांगल्या अद्ययावत खोलीची व्यवस्था करावी.
  5. रुग्णालय परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवावी, पुरेशा सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी.

Web Title: Strike strike of resident doctors in the state from today; Protests against the incident in Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.