भररस्त्यात अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण, नागरिकांची बघ्याची भूमिका, आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 06:29 AM2017-10-22T06:29:11+5:302017-10-22T06:29:24+5:30
छेडछाड करून भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली.
मुंबई : छेडछाड करून भररस्त्यात अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण केल्याची घटना मंगळवारी कुर्ला येथे घडली. धक्कादायक बाब म्हणजे, हा प्रकार सुरू असताना केवळ बघ्यांची गर्दी झाली होती; कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आले नाही. पोलिसांनी शनिवारी आरोपीला विनयभंग आणि मारहाणीच्या गुन्ह्यात अटक केली.
नेहरूनगर परिसरात कुटुंबीयांसमवेत राहणारी ही १६ वर्षीय मुलगी मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खासगी शिकवणीसाठी बाहेर पडली. त्याच वेळी तिच्याच इमारतीत राहणाºया इम्रान शेखने मित्रांसोबत अश्लील शेरेबाजी केली.
रागावलेल्या मुलीने न घाबरता याचा जाब विचारताच चिडलेल्या इम्रानने तिला भररस्त्यातच अमानुषपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. ते पाहताच तिथे बघ्यांची गर्दी वाढली, ती मदतीसाठी विनवणी करीत होती; मात्र कोणीही पुढे येऊन तिला सोडवले नाही. मारहाणीत ती बेशुद्ध पडली. ही बाब तिच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नेहाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
नेहरूनगर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून सुरुवातीला केवळ मारहाणीचाच गुन्हा दाखल करत इम्रानला अटक केली. मात्र जामिनावर इम्रानची त्यातून सुटका झाली. तिच्या कुटुंबीयांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेताच नेहरूनगर पोलिसांनी शनिवारी पीडित मुलीचा पुन्हा एकदा जबाब नोंदविला आणि या प्रकरणात विनयभंग गुन्ह्याचा समावेश करत इम्रानला पुन्हा बेड्या ठोकल्या आहेत.
यापूर्वीही काढली होती छेड
इम्रानने यापूर्वीही नेहाची छेड काढली होती. मात्र सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग, पॉक्सोचीही कारवाई केली. इम्रानने मुलीला मारहाण केली तेव्हा त्याच्या हातात कडे असल्याने नेहाला जास्त मार बसल्याचेही पोलिसांनी सांगितले.
>नव्याने जबाब नोंदविला
नेहरूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपर्डे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता, तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. मात्र तिच्या वैद्यकीय अहवालात नाकाला फ्रॅक्चर असल्याचे समोर आले. त्यामुळे तिचा नव्याने जबाब नोंदवून आरोपीला पुन्हा अटक केली, असे त्यांनी सांगितले.