काँग्रेसच्या बैठकीत जोरदार वाद
By admin | Published: January 11, 2016 11:33 PM2016-01-11T23:33:12+5:302016-01-12T00:30:44+5:30
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा : नगरसेविकेच्या पतीने पक्षप्रमुखांना सुनावले खडे बोल
इचलकरंजी : हरित शहर, सोलर सिटी, वाय-फाय आणि उन्हाळ्यातील शहराचे पाणी नियोजन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर आयोजित नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेविषयी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी घेतलेल्या कॉँग्रेसच्या बैठकीत जोरदार वादावादी झाली. याच विषयासाठी शहर विकास आघाडीची बैठक मात्र शांततेत पार पडली.
नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी बुधवारी पालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सभेच्या विषयपत्रिकेवर २३ विषय असून, त्यावर विचारविनिमय करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सोमवारी सभेसमोर असलेले हरित शहर, वाय-फाय सिटी, सोलर सिटी व आगामी उन्हाळ्यात भासणाऱ्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर करावे लागणारे नियोजन अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
शहरामध्ये विविध अशा आठ ठिकाणी एका खासगी संस्थेकडून फोरजी वाय-फाय सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे प्रदूषण अधिक होते. या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यासाठी ४७ लाख रुपये खर्च येणार असून, त्यासाठी वनविभागाचे सहाय्य होणार आहे. सोलर सिटी हा अत्यंत महत्त्वाचा विषय राबविण्यासाठी एका खासगी कंपनीमार्फत आलेल्या प्रस्तावाबाबत चर्चा करणे, अशा आशयाच्या सभेसमोर असलेल्या विषयावर यावेळी चर्चा झाली.
चर्चा सुरू असतानाच आर्थिक नियोजनाबाबत नियमितता नसल्याबद्दल एका नगरसेविकेच्या (ज्या माजी अध्यक्षा होत्या) पतीने बैठकीत जोरदार आक्षेप घेतला. यावर पक्षप्रमुख व त्या पतीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये नगरसेविकेनेसुद्धा त्या प्रमुखाला खडसावले. थोड्या वेळाने बैठकीसाठी उपस्थित असलेल्या अन्य ज्येष्ठांनी मध्यस्थी केली. (प्रतिनिधी)
नवीन पाणी योजनेवरून खडाजंगी
शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे देण्याचा विषय या सभेसमोर आहे. काळम्मावाडी धरणातून थेट पाण्याची योजना पालिकेला पेलवणारी नाही. म्हणून शासनाने नगरपालिकेला पर्याय सुचविण्यासाठी सांगितले आहे. अशा पार्श्वभूमीवर सुळकूड (ता. कागल) येथून काळम्मावाडीचे किंवा वारणा नदीतून पाणी योजना राबवणे असे पर्याय पालिकेसमोर आहेत. याबाबत नगरपालिकेच्या या सभेमध्ये तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे, तर नगराध्यक्षांनी दिलेल्या काही हुकमांनाही कॉँग्रेसकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता असल्याने सभा वादळी होईल, असा व्होरा आहे.
उपनगराध्यक्षांचा राजीनामा लांबणीवर
बैठकीतील निर्णय : नगरपालिकेतील वर्षाच्या घडामोडींचा ऊहापोह
इचलकरंजी : नगरपालिकेतील राजकीय गुंतागुंत आणि विश्वासू चेहरा दिसत नसल्याने येथील उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचा राजीनामा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. सोमवारी झालेल्या पक्षप्रमुखांच्या बैठकीमध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेनंतरच पुन्हा बैठक घेऊन उपनगराध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचे निश्चित करण्यात आले.
नगरपालिकेत असलेल्या एकूण ५७ नगरसेवकांपैकी २९ नगरसेवक कॉँग्रेसचे आहेत. साधारणत: दीड वर्षांपूर्वी रणजित जाधव यांची उपनगराध्यक्षपदी निवड करताना उर्वरित कालावधीमध्ये महावीर जैन व भीमराव अतिग्रे यांना प्रत्येकी दहा महिने उपनगराध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता; पण जानेवारी २०१५ मध्ये नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यांना विरोधी शहर विकास आघाडीने पाठिंबा दिला आणि पालिकेतील राजकीय संदर्भच बदलले. नगरपालिकेतील नगराध्यक्षांचे बंड आणि तद्नंतर गेल्या वर्षभरात बदलत गेलेली राजकारणाची परिस्थिती यामुळे आता पालिकेच्या पुलाखालून बरेचसे पाणी गेले आहे. कॉँग्रेसमध्ये गटबाजी बोकाळली आहे. कमालीच्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे पालिकेच्या राजकीय वातावरणात इतकी
धूळ उडाली आहे की, पक्षश्रेष्ठींशी एकनिष्ठ राहील, असे चेहरेच दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांचा राजीनामा मंजूर करणे म्हणजे पालिकेवरील राहिलेली पकडही गमावणे, असे झाले
आहे.
अशा पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली पक्षातील व नगरपालिकेतील प्रमुखांची बैठक सोमवारी झाली. बैठकीमध्ये नगरपालिकेतील बदललेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. नगराध्यक्षा
बिरंजे यांचे बंड, त्यानंतर गेलेला वर्षभराचा कालावधी, नुकतीच झालेली विधानपरिषद निवडणूक आणि बुधवारी आयोजित केलेली नगरपालिकेची सर्वसाधारण
सभा, आदी बाबींचा यावेळी ऊहापोह करण्यात आला. (प्रतिनिधी)
सह्या करण्यास नकार; पक्षश्रेष्ठींना गांभीर्य
बंड करणाऱ्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी गेल्या सप्ताहात पक्षाकडून नगरसेवकांच्या सह्या घेण्यात येत होत्या. प्रस्तावावर २२ जणांनीच सह्या केल्या, तर बंडखोर मानल्या जाणाऱ्या सहा नगरसेवकांनी सह्याच केल्या नाहीत आणि एका ज्येष्ठ नगरसेवकाने सही करण्यास नकार दिला. या घटनेकडे आता पक्षश्रेष्ठी गांभीर्याने पाहत आहेत.