‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2016 01:51 AM2016-10-03T01:51:02+5:302016-10-03T01:51:02+5:30

अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत

Strong enforcement of 'Atrophy' | ‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा

‘अ‍ॅट्रॉसिटी’ची कडक अंमलबजावणी करा

Next


वालचंदनगर : अ‍ॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करावा, या गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालये स्थापन करावीत, यासह अन्य मागण्यांसाठी रविवारी वालचंदनगर ते जंक्शन या मार्गावर वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे बहुजन क्रांतीचा विराट मोर्चा शांततेच्या मार्गाने पार पडला.
‘एकच पर्व बहुजन सर्व’ असे घोषवाक्य घेऊन इंदापूरसह गावोगावचे मागासवर्गीय बहुजन बांधवांसह मुस्लिम बांधव या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. जवळपास ७ किलोमीटर लांबीच्या मार्गावर बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वालचंदनगर जुने बसस्थानकापासून दुपारी १ वाजता बहुजन क्रांती विराट मोर्चा जंक्शनकडे निघाला. सात किलोमीटर पायी चाललेल्या मोर्चात लहान मुले, शालेय विद्यार्थ्यांसह हजारो महिलांनी सहभाग घेतल्याने या बहुजन क्रांती विराट मोर्चाला सर्वत्र दिंडीचे स्वरूप आले होते. या मोर्चात अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मोर्चात महिलांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात होती.
इंदापूरसह वालचंदनगर, जंक्शन येथील विराट मोर्चात बारामती, इंदापूर, अकलूज, भिगवण येथील हजारो बहुजन समाज एकवटला होता. या मोर्चाला बहुजन समाजातील हजारो महिला, शालेय विद्यार्थी तसेच चिमुकल्यांनीही सहभाग घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला अधिकार काढून घेतल्यास हा दलित बहुजन समाज गप्प बसणार नाही. दलितांसाठी हे अ‍ॅट्रॉसिटीचे कवच आहे. कवच काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास बहुजन समाज गप्प बसणार नाही, असे बहुजन समाजातील तरुणांनी मनोगत व्यक्त केले. या कायद्यात नुकतीच सुधारणा करण्यात आली आहे. त्यामध्ये अनेक कडक तरतुदी आहेत. (वार्ताहर)
>जंक्शन चौकात मोर्चा स्थिरावला...
जंक्शन चौकात बारामती, इंदापूर, वालचंदनगर, कळस या मुख्य रस्त्यावर बहुजन क्रांतीचा मोर्चा एकत्रित येऊन स्थिरावला. जंक्शन येथे तीन तास बहुजन क्रांती मोर्चा स्थिरावला होता. या बहुजन क्रांती विराट मोर्चासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायकपोलीस निरीक्षक गजानन गजभारे, वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
>पूजा जाधव खूनप्रकरणाची सीबीआयमार्फत तपास करा...
तसेच इंदापूर तालुक्यातील तावशी येथील पूजा जाधव या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करावा. या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस अधिकारी, सरकारी वकील, निलंबित न्यायाधीशांची चौकशी करावी, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याची फेरसुनावणी करावी, अशीमागणी करण्यात आली. तहसीलदार श्रीकांत पाटील यांना शालेय मुलींच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
>मागण्यांचे केले जाहीर वाचन...
बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या सर्वांपुढे वाचून दाखवण्यात आल्या.
‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा अधिक कडक करावा, या कायद्यातंर्गत दाखल झालेल्या खटल्यांसाठी स्वतंत्र्य न्यायालये सुरू करावीत, या खटल्यांचा
निकाल ६ महिन्यात लागावा, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत खोटी तक्रार
करायला लावणाऱ्या, गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणणाऱ्यांवर याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावेत. ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करावी, मराठा आरक्षण देताना ओबीसींच्या कोट्यातून देऊ नये, विमुक्त भटक्या समाजालादेखील ‘अ‍ॅट्रॉसिटी’कायद्याच्या कक्षेत आणावे, मुस्लिम बांधवांच्या विकासासाठी ‘सच्चर आयोगा’च्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या मागण्या करण्यात आल्या.
>कायद्याची बदनामी...
देशातील दलित, मागासवर्गीयांना, सर्व जातीच्या महिलांना या कायद्यामुळे संरक्षण मिळाले आहे. मात्र, मराठा समाजाच्या मोर्चात चुकीच्या पद्धतीने या कायद्याला बदनाम केले जात आहे. मराठा आरक्षण, कोपर्डीतील आरोपींना शिक्षा याला आमचा पाठिंबा आहे परंतु ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायदा रद्दच करा, अशी मागणी बारामतीच्या मोर्चात केली गेली. त्याचबरोबर दलित, आदिवासींच्या भावना दुखवणारी आणि भडक भाषणे पोलीस, महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केली जात आहेत. त्याला आमचा विरोध आहे, असे या वेळी ठणकावून सांगितले.

Web Title: Strong enforcement of 'Atrophy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.