जबरदस्त ‘दिलस्कूप’
By admin | Published: June 26, 2015 02:13 AM2015-06-26T02:13:42+5:302015-06-26T02:13:42+5:30
मित्रांनो, सध्या टी-२० या फास्ट क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक अजिबोगरीब फटके बघायला मिळतात ना.. मग तो स्विच हिट असो, रिव्हर्स स्विप असो की पॅडल स्विप.
रोहित नाईक -
मित्रांनो, सध्या टी-२० या फास्ट क्रिकेटमध्ये आपल्याला अनेक अजिबोगरीब फटके बघायला मिळतात ना.. मग तो स्विच हिट असो, रिव्हर्स स्विप असो की पॅडल स्विप.. हे सगळेच फटके बघताना खूप मज्जा येते, हो ना.. असाच एक जबरदस्त शॉट आहे ‘दिलस्कूप’.. हा शॉट कसा आणि कोणी मारायला सुरुवात केली माहितेय का? श्रीलंकेचा धडाकेबाज ओपनर तिलकरत्ने दिलशान याने. दिलशान बऱ्याचदा पॅडल स्विप शॉट मारत असे. एकदा २००९ सालच्या आयपीएलमध्ये त्याने खाली बसून मागच्या बाजूला विकेटकीपरच्या डोक्यावरून कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हा फटका मारला. सगळेच चकित झाले. हा कोणता शॉट? असाच सगळे विचार करत होते. यानंतर तर दिलशानने अनेकदा हा शॉट खेळून सर्वांनाच नाचवले. बरं, यानंतर दुसऱ्या बॅट्समन्सनी देखील हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलशानसारखी मास्टरी कोणालाही मिळाली नाही. त्यामुळेच या शॉटला ‘दिलस्कूप’ असे नाव मिळाले. बरं, हा शॉट सहजासहजी त्याने खेळला नाही. यासाठी त्याने बरीच मेहनतही घेतली आहे. विश्वास बसणार नाही पण हा शॉट खेळण्यासाठी आधी तो चक्क टेनिस बॉलने प्रॅक्टिस करायचा आणि नंतर त्याने लेदर बॉलवर प्रयोग केले. खडतर परिश्रम आणि मेहनत घेतल्यामुळेच क्रिकेटविश्वाला नवीन शॉट मिळाला.