कणखर अपृष्ठवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:29 AM2018-05-22T07:29:42+5:302018-05-22T07:29:42+5:30

महाराष्ट्रालादेखील या अपृष्ठवंशी प्राण्यांचे वरदान लाभले आहे. यात कीटकांचा सहभाग सर्वात अमूल्य आहे.

Strong invertebrate | कणखर अपृष्ठवंशी

कणखर अपृष्ठवंशी

Next

अपृष्ठवंशी प्राणी हे जगातील सर्वांत जैवविविध गट असूनदेखील त्यांच्याबद्दल लोकांना खूपच कमी आत्मीयता वाटते. सर्व प्राणिमात्रात त्यांचा सहभाग दोनतृतीयांश आहे. संख्या आणि विविधतेच्या दृष्टीने, अपृष्ठवंशी प्राणी स्पष्ट विजेते आहेत. पृथ्वीच्या प्रत्येक उपलब्ध कोनाडात (जमीन, हवा आणि समुद्र), अपृष्ठवंशी प्राण्यांची व्याप्ती आहे. तरीदेखील ५ टक्के असलेले सस्तन प्राणी जसे वाघ, सिंह, हत्ती आणि अस्वल हे जास्त लक्ष वेधून घेतात आणि लोक बाकीच्या इटुकल्या पिटुकल्या प्राण्यांना दूर लोटून देतात.
पर्यावरणातील प्रत्येक अन्नसाखळीत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अपृष्ठवंशी प्राणी पोषक म्हणून कार्यरत आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांचे (मासे, उभयचर, सरिसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी) अन्न म्हणून मोलाची भूमिका असो किंवा विघटक म्हणून असो अपृष्ठवंशी प्राणी अन्न जाळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. काही परजीवी प्राण्यांखेरीज बहुतांश अपृष्ठवंशी प्राणी हे आवश्यक पर्यावरण-सेवा पुरवितात. जसे परागीकरण, खनिजांचा पुनर्वापर करणे आणि मोम, मध, लाख, रेशमसारख्या लहान वन उत्पादनांची निर्मिती करणे.
महाराष्ट्रालादेखील या अपृष्ठवंशी प्राण्यांचे वरदान लाभले आहे. यात कीटकांचा सहभाग सर्वात अमूल्य आहे आणि त्यांच्या प्रजाती विविध आहेत. फक्त कीटक बघितले तरी ते ३२ आॅर्डरमध्ये विभागले जातात. त्यापैकी बहुतांश कीटक हे मुंग्या, बीटलस्, फुलपाखरे आणि पतंग, नाकतोडे, चतुर आणि टाचणी, माशा व मधमाशा, गांधीलमाशी, अशा शेकडो जाती, प्रजाती आणि उपजाती आपल्या समुद्रकिनारी, सह्याद्रीच्या डोंगरात, दख्खनच्या पठारावर आणि मध्य भारताच्या घनदाट जंगलात सापडतात.
मुंग्या : जगातील सर्वात बलाढ्य प्राण्यांमध्ये मुंग्यांना धरले जाते. त्यांची संख्या, काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सामाजिक संरचना हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.
फुलपाखरे आणि पतंग : सौंदर्याची परिभाषा म्हणजे फुलपाखरे आणि पतंग. त्यांनी जर परागीकरण केले नाही, तर अर्धी मनुष्यवस्ती उपाशी मरेल. असे म्हणतात की, हे नष्ट होण्याच्या चौथ्या दिवशी पृथ्वी बंद पडेल.
गांधीलमाशी : आपल्याला चावतात म्हणून आपण त्यांची घरटी तोडतो; परंतु या प्राण्यांनी जगात सर्वात प्रथम पानांपासून कागद बनवला होता. त्यावरूनच चिनी लोकांनी कागद बनवणे शिकले. या गांधीलमाशा, भाज्या खाणाऱ्या अळ्या आणि रोगराई पसरवणाºया माशांचे नियंत्रण करतात.
फिड्डलर कॅ्रब : समुद्रकिनारी दशपदी खेकडे आणि फिड्डलर क्रॅब हे शेती करीत असतात. रात्रं-दिवस ते वाळूतील अन्न खोलवर लपवून जुनी वाळू परत वर फेकत असतात, ज्यामुळे किनारपट्टीची शेती होते आणि त्यात प्राणवायू जातो. यामुळे वाळूत राहणाºया प्राण्यांना प्राणवायू मिळतो.
गोम आणि पैसाकिडा : शेकडो पायांचे हे प्राणी डायनासोरच्या युगातून आपल्या युगात जगले आहेत. आपल्या द्रव आणि रासायनिक फवारणीमुळे ते नष्ट होऊ लागले आहेत. रात्री-अपरात्री वावरणारे हे प्राणी खूपच महत्त्वाचे विघटक आहेत. त्यांच्या शिवाय मृतांपासून पुनरुज्जीवन अशक्य आहे!

- आनंद पेंढरकर, जयेश विश्वकर्मा, मुंबई

Web Title: Strong invertebrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.