स्वतंत्र विदर्भाला ठाम विरोध
By Admin | Published: January 19, 2015 04:09 AM2015-01-19T04:09:12+5:302015-01-19T04:09:12+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न करता ते शिवरायांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले, पराक्रम केला, त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे.
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात न करता ते शिवरायांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केले, पराक्रम केला, त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ करण्यास आमचा ठाम विरोध राहील, असा इशारा श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांनी रविवारी दिला.
येथील गांधी मैदानावर श्री वैराटगड ते श्री सप्तर्षीगड (अजिंक्यतारा) या २९व्या धारातीर्थ यात्रेचा (मोहीम) समारोप झाला. यावेळी उपस्थित असलेल्या २५ हजारांहून अधिक धारकऱ्यांसमोर ते बोलत होते. शिवरायांचे स्मारक उभे करायचे झाल्यास ते ज्या गड-किल्ल्यावर त्यांनी वास्तव्य केले, पराक्रम केला, त्या ठिकाणी होणे गरजेचे आहे. हे स्मारक समुद्रात होऊ नये, असे ते म्हणाले. त्याचबरोबर महाराष्ट्रातून वेगळा विदर्भ करण्याचे कारस्थान सुरू आहे. पण, आमचा वेगळ्या विदर्भाला हा ठाम विरोध राहणारच आहे. महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा होणे कधीही शक्य नाही, असे त्यांनी नमूद केले.