कामगिरी दमदार, पण वादाचीही किनार, शिंदे- फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती

By यदू जोशी | Published: June 30, 2023 09:54 AM2023-06-30T09:54:44+5:302023-06-30T09:55:47+5:30

Shinde-Fadnavis Government: राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले; पण काही वादांची किनारही या कामगिरीला आहे. 

Strong performance, but edge of controversy, Shinde-Fadnavis government completes one year today | कामगिरी दमदार, पण वादाचीही किनार, शिंदे- फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती

कामगिरी दमदार, पण वादाचीही किनार, शिंदे- फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती

googlenewsNext

- यदु जोशी
मुंबई - राज्यातील एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या काळात सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले; पण मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, त्यातून आलेली नाराजी, महाराष्ट्रभूषण समारंभातील दुर्घटना अशा काही बाबींची किनारही या कामगिरीला आहे. 

महाविकास आघाडी सरकारमधून शिंदे समर्थक आमदारांसह बाहेर पडले आणि शिंदे-फडणवीस जोडीने चमत्कार करत युतीचे सरकार आणले. ९ ऑगस्टला १८ मंत्र्यांचा समावेश करीत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. तेव्हापासून दुसऱ्या विस्ताराची प्रतीक्षा आहे. शिंदेंसोबत असलेले बच्चू कडू, आशिष जयस्वाल यांनी याबाबत वेळोवेळी नाराजीही दाखविली आहे.

सामान्य शिवसैनिक ते मुख्यमंत्री असा अद्भूत प्रवास केलेले शिंदे यांनी, ‘आमचे सरकार हे देणारे सरकार आहे’ असे सुरुवातीपासूनच सांगितले आणि लोकाभिमुख निर्णयांद्वारे त्याची प्रचितीही दिली. फडणवीस यांच्या अनुभवाचा त्यासाठी फायदा झाला. शिंदे- फडणवीस यांच्यात जबरदस्त समन्वय सुरुवातीपासूनच दिसत होता; पण काही दिवसांपूर्वी ‘देशात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेकडून दिली गेली आणि मिठाचा खडा पडला. त्यावरून सारवासारवही झाली. आता दोघांनीही त्यावर पडदा टाकला आहे. भाजप- शिवसेनेमध्ये समन्वय समिती अजूनही बनलेली नाही, महामंडळांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. यातच विरोधकांच्या टीकेला उत्तरे देण्यातही सरकारचा बराच वेळ गेला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाची टांगती तलवार असल्याने सरकारबाबतची अनिश्चितता बरेच महिने होती; पण अखेर सरकारला सर्वोच्च दिलासा मिळाल्याने सरकारची गतिमानता वाढल्याचे दिसत आहे. 

वर्षभरातील काही महत्त्वाचे निर्णय
- एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास
- राज्यात नऊ वैद्यकीय महाविद्यालये 
-संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेच्या मानधनात वाढ
- महात्मा जाेतीराव फुले जनआरोग्य योजनेत पाच लाखांचे कवच
- शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये देणार
- अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या दुप्पट रक्कम. दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत
- कांदा उत्पादकांना क्विंटलमागे ३५० रु.चे अर्थसाहाय्य
- धान उत्पादकांना हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर मदत
- एक रुपयांत पीक विमा. ३,३१२ कोटी रुपये सरकार भरणार
- नवे रेती धोरण
- गोसेवा आयोग स्थापणार
- जलयुक्त शिवार टप्पा दाेन सुरू 
- मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९५ टक्के पूर्ण
- ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार
- स्वातंत्र्यसैनिकांच्या निवृत्ती वेतनात १० हजार रु. वाढ
- औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव
- दावोस येथे महाराष्ट्रात एक लाख ३७ हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार. या व्यतिरिक्त ६० हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले.
- स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग सुरू
- दिवाळीप्रमाणेच गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा.
- ७५ हजार रिक्त पदे भरती सुरू. 
- शासन आपल्या दारी उपक्रमास सुरुवात
- पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती रकमेत वाढ
- धनगर समाजासाठी एक हजार कोटी. महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळ
- मुंबईत अधिमूल्य, विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत
- नवीन वस्त्रोद्योग धोरणास. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
- नवीन कामगार संहितेस मान्यता
- महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर
- कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात १० हजार रुपये वाढ.

 

Web Title: Strong performance, but edge of controversy, Shinde-Fadnavis government completes one year today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.