सख्खे नातेवाईक पक्के वैरी; कोण जिंकले, कोण हरले?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:10 PM2024-10-18T12:10:35+5:302024-10-18T12:12:55+5:30
राज्याच्या राजकारणात सगेसोयऱ्यांमधील संघर्ष आजवर अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. या निवडणुकांमध्ये घराण्यातील नेते किंवा त्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध लढले. यात कोणाच्या नशिबी हार आली, तर कोणी विजय मिळवित विधानसभा गाठली...
मुंबई : राज्याच्या राजकारणात सगेसोयऱ्यांमधील संघर्ष आजवर अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला आहे. या निवडणुकांमध्ये घराण्यातील नेते किंवा त्यांचे वारसदार एकमेकांविरुद्ध लढले. यात कोणाच्या नशिबी हार आली, तर कोणी विजय मिळवित विधानसभा गाठली. एकदुसऱ्याशी राजकीय वैर असलेले एकाच कुटुंबातील काही नेते कालांतराने राजकीय परिस्थिती किंवा अपरिहार्यता म्हणून एकत्र आले अशीही उदाहरणे आहेत.
भाऊ-बहीण आले एकत्र
२०१९ मध्ये तत्कालीन ग्रामविकास आणि महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे या परळी मतदारसंघात भाजपकडून लढल्या. समोर प्रतिस्पर्धी होते, त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे. त्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी ३० हजारांवर मतांनी पंकजा यांचा पराभव केला होता. अशीच लढत दोघांमध्ये २०१४ मध्येही झाली होती आणि पंकजा २५ हजारांवर मतांनी जिंकल्या होत्या. आज भाजप व अजित पवार गट हे महायुतीचे घटक आहेत आणि मुंडे बंधू-भगिनी एकत्र आहेत. लोकसभेला धनंजय यांनी पंकजा यांचा जोरदार प्रचार केला होता, आता पंकजा या धनंजय यांचा जोरदार प्रचार करताना दिसतील.
आधी विरोध, आता एकत्र
पुसदच्या प्रख्यात नाईक घराण्यातील दोन वारस २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकले. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) विरुद्ध नीलय नाईक (भाजप) असा सामना झाला आणि इंद्रनील यांनी बाजी मारली होती. योगायोग म्हणजे आता दोघेही चुलतभाऊ हे महायुतीमध्ये एकत्र आहेत.
काका-पुतण्यात संघर्ष
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका आणि शिवसेनेचे उमेदवार, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा १९८४ मतांनी पराभव केला होता.
सख्खे भाऊ आमने-सामने
गत निवडणुकीत सातारा जिल्ह्यातील माण मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध अपक्ष प्रभाकर देशमुख असा अटीतटीचा सामना गोरे (९१,४६९) यांनी सुमारे तीन हजार मतांनी जिंकला. देशमुख यांना ८८,४२६ मते मिळाली. त्यावेळी भाजप-शिवसेनेची राज्यात युती होती; पण माण व कणकवलीत फक्त युती नव्हती. जयकुमार यांचे सख्खे भाऊ शेखर गोरे (शिवसेना) रिंगणात होते; पण ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
राजघराण्यातील लढाई
सातारचे सध्याचे खासदार उदयनराजे भोसले (भाजप) हे १९९९ मध्ये त्यांचे चुलते अभयसिंहराजे भोसले (राष्ट्रवादी) यांच्याकडून पराभूत झाले होते. आता अभयसिंहराजे यांचे पुत्र शिवेंद्रसिंह सातारचे आमदार आहेत आणि ते व उदयनराजे दोघेही भाजपमध्ये आहेत. १९९० उदयनराजे यांच्या आई कल्पनाराजे (शिवसेना) विरुद्ध अभयसिंहराजे अशी लढत
झाली; पण अभयसिंहराजे सहज जिंकले होेते.
काका-पुतण्या आणि आजोबा-नातू लढत
लातूर जिल्ह्यातील निलंगा मतदारसंघाने तर काका-पुतण्या आणि आजोबा-नातू असा राजकीय संघर्ष गेली अनेक वर्षे अनुभवला. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संभाजी पाटील-निलंगेकर यांनी त्यांचे काका अशोकराव
पाटील-निलंगेकर यांचा पराभव केला. तर २००४ च्या निवडणुकीत संभाजी पाटील-निलंगेकर यांनी त्यांचे आजोबा माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा अटीतटीच्या लढतीत दोन हजारांवर मतांनी पराभव केला होता. मात्र, २००९ मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातू संभाजी यांना पराभूत केले होते.
काका-पुतण्याच्या लढाईत तिसराच झाला विजयी
सांगली विधानसभा मतदारसंघात १९९५ मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पुत्र प्रकाशबापू पाटील हे काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात त्यांचे पुतणे मदन पाटील हे अपक्ष लढले. दोघांमधील मतविभाजनाचा फायदा होऊन जनता दलाचे संभाजी पवार विजयी झाले होते.
भावजय-दीर सामना
२०१४ मध्ये सिंदखेडराजा मतदारसंघात रेखाताई खेडेकर (राष्ट्रवादी) व डॉ. शशिकांत खेडेकर (शिवसेना) हे भावजय व चुलत दीर एकमेकांविरोधात लढले होते. डॉ. खेडेकर विजयी झाले होते.