रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीत तगडा बंदोबस्त
By Admin | Published: July 5, 2016 08:13 PM2016-07-05T20:13:12+5:302016-07-05T20:13:12+5:30
रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीतील विविध भागात आज पोलिसांनी पथ संचलन करून दुपारपासूनच गस्त वाढवली.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ५ : रमजान ईदच्या निमित्ताने उपराजधानीतील विविध भागात आज पोलिसांनी पथ संचलन करून दुपारपासूनच गस्त वाढवली. ईद उत्साहात साजरी व्हावी आणि समाजकंटकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव करण्याची संधी मिळू नये म्हणून शहर पोलीस दलातर्फे तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
शहरातील सर्वधर्म समभाव, सलोखा कायम राहावा, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या उत्साहात भर पडावी म्हणून पोलिसांतर्फे गेल्या काही दिवसात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. त्यात प्रामख्याने विविध समाजातील मान्यवरांचा समावेश असलेल्या शांतता समित्या, महिला समिती, दक्षता समितीच्या सदस्यांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत वेगवेगळळ्या बैठका घेण्यात आल्या. सणोत्सवाचे निमित्त साधून काही समाजकंटक उपद्रव करतात आणि तणाव निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशा समाजकंटकांच्या हालचालीवर मोहल्ल्यातील दक्षता समितीच्या सदस्यांनी नजर ठेवून वेळीच पोलिसांना कळविण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. कोणत्याही अनोळखी आणि संशयीत व्यक्तीबाबत वेळीच पोलिसांना कळविण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. शहरातील गस्त मंगळवार दुपारपासून वाढवण्यात आली. विविध पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील संवेदनशिल वस्त्यांमध्ये मंगळवारी सायंकाळी पथसंचलन केले. जागोजागी बंदोबस्तही वाढवण्यात आला.