अभिजातच्या लढ्याला एकीचे बळ : विधानसभेपूर्वी शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 07:00 AM2019-07-05T07:00:00+5:302019-07-05T07:00:05+5:30
मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे.
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात पहिल्यांदाच केलेले भाष्य आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राज्यसभेत दिलेली हमी यामुळे अभिजात दर्जाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातच्या दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित लढा लढण्यास साहित्यिकांनी कंबर कसली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी चार-पाच वर्षांपासून विविध स्तरांवर प्रयत्न सुरु आहेत. अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीचा महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली ५५० पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला आहे. बडोदा येथील साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याबाबत दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पत्रेही पाठवण्यात आली.
अभिजातसह इतर मागण्यांसाठी २४ जूनला मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर अभिजात दर्जाबाबत मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन दिले. त्यानंतर काही दिवसांमध्येच विनोद तावडे यांनीही विधीमंडळात अभिजात दर्जाबाबत सकारात्मक भाष्य केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. शासन स्तरावरील या हालचाली पाहता विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठीच्या अभिजात दर्जावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती सुत्रांकडून मिळाल्याचे साहित्य क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
अभिजातच्या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. मिलिंद जोशी, राजन खान, संजय सोनवणी, प्रा. हरी नरके, डॉ. सदानंद मोरे, संजय नहार आदी मान्यवरांचा साहित्यिक गोतावळा नुकताच एकत्र जमला होता. एकट्याने लढलेली लढाई कायमच अवघड असते. याउलट एकीचे बळ कायमच वरचढ ठरते. त्यामुळे मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात असताना काश्मीरी, आसामी, अर्धमागधी, प्राकृत, पाली या भाषांना अभिजात दर्जा मिळवून दयायचा असेल तर यापुढे भाषा, प्रांत, प्रदेशाच्या सीमा ओलांडून सर्व साहित्यिकांनी एकत्र आले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत झाले. डॉ. सदानंद मोरे यांनी या चळवळीचे नेतृत्व करावे, यावरही या बैठकीत चर्चा झाली.
........
मराठीचा अभिजात दर्जा दृष्टीक्षेपात आला आहे. आता महाराष्ट्राने नेतृत्व करुन इतर भाषांना अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, याबाबत चर्चा झाली. भाषांची चळवळ एकत्रितपणे लढली जावी, हाच सर्वांचा प्रयत्न असेल. प्रत्येकाने आपापला लढा लढल्यास तो एकाकी ठरतो. याउलट सर्वांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. काश्मीरी, आसामी, पाली, अर्धमागधी यांना अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी हे प्रयत्न आवश्यक आहेत.
- संजय सोनवणी, साहित्यिक
..........
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पहिल्यांदाच एवढी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी साहित्यिकांच्या शिष्टमंडळाला दिलेले आश्वासन, भाषामंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांचे भाष्य ही सुसंगती लक्षात घेता विधानसभा निवडणुकांपूर्वी अभिजातचा प्रश्न मार्गी लागेल, अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. अभिजातचा मुद्दा ५०० कोटी रुपयांपेक्षाही महाराष्ट्राचा अभिमानबिंदू म्हणून जास्त महत्वाचा आहे.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, मसाप