मुंबईत जोरदार सरी

By admin | Published: June 14, 2015 02:11 AM2015-06-14T02:11:12+5:302015-06-14T03:53:33+5:30

मुंबईसह उपनगरांत शनिवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर पावसादरम्यान झालेल्या वाहतूक

Strongly in Mumbai | मुंबईत जोरदार सरी

मुंबईत जोरदार सरी

Next

मुंबई : मुंबईसह उपनगरांत शनिवारी सकाळी पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. तर पावसादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांची सकाळची अर्धाअधिक वेळ पाण्यातच गेली.
मान्सून शुक्रवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर पहिला दिवस कोरडाच गेला. तर शनिवारी सकाळपासूनच पावसाने जोर पकडला. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरासह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हिंदमाता येथे पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. उदंचन पंप व मनुष्यबळाच्या मदतीने येथील पाण्याचा निचरा करण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक पूर्वपदावर आली. तर लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला आणि घाटकोपर येथे पावसादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीने प्रवाशांच्या नाकी नऊ आणले होते. सकाळी सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावल्याचे चित्र होते. दुपारनंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली.
महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावसादरम्यान शहरात १४, पूर्व उपनगरांत ५ आणि पश्चिम उपनगरांत १२ अशी एकूण ३१ ठिकाणी झाडे पडली. महालक्ष्मी पुलाजवळ झाड पडून दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. त्यांना नायर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पुढील २४ तासांत मुंबईत पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Strongly in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.