....म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या नाशिक दौऱ्याला तीव्र विरोध करणार : विनायक मेटे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 04:44 PM2020-08-08T16:44:43+5:302020-08-08T17:27:36+5:30
...अन्यथा १७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज आंदोलन करणार
पुणे: महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाविषयी निष्काळजीपणा दाखवत आहे.सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आणि त्याला सर्वस्वी अशोक चव्हाण हे जबाबदार आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच सुप्रीम कोर्टात सुनावणी सुुरू असलेले आरक्षण जातेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आणि म्हणून उद्या ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त नाशिक दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना काळे कपडे घालून,मशाली पेटवून विरोध करणार असल्याचेे शिवसंग्राम पक्षाचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सांगितले आहे.
आमदार मेटे म्हणाले,मराठा आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे असून त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे चव्हाण यांना या पदावरून बाजूला करण्यात यावे अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी जर मराठा समाज बांधवांचा आरक्षणाविषयीचा उद्याचा आवाज ऐकला नाही तर १७ ऑगस्टला राज्यात सर्वत्र आंदोलन छेडण्यात येईल.आणि जोपर्यंत राज्य सरकार आपली भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन पुढे सुरू राहणार असल्याचे सांगितले.
शनिवारी ( दि. 8) पुण्यात आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
मेटे म्हणाले, सारथी बैठक सोडली तर राज्य सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशोक चव्हाण यांच्याकडील जबाबदारी काढून ती एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात यावी यासाठी राज्यातील १३ मराठा संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. मराठा आरक्षण कोर्टात टिकवले पाहिजे.त्याचप्रमाणे उच्च न्यायालयात ज्या वकिलांनी केस टिकवली त्यांना केस लढवू दिली जात नाही. उद्या नाही ऐकले तर १७ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात मशाली पेटवून,जागरण गोंधळ घालून आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा मेटे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,अशोक चव्हाण यांना मराठा समाजाने प्रश्न विचारावे. समाजाला मराठा आरक्षणाबाबत एक बैठक घेऊन माहिती देण्यात यावी,असेही मेटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.