स्ट्रक्चरल आॅडिटने टळेल इमारतीचा धोका...
By Admin | Published: August 14, 2016 02:44 AM2016-08-14T02:44:18+5:302016-08-14T02:44:18+5:30
संकटे ही कधी सांगून येत नाहीत, असे म्हणतात़ पण संकटाची चाहूल मात्र लागत असते़ फक्त त्या वेळी सतर्क राहून खबरदारी घेतल्यास संकट टाळता आले नाही, तरी शेकडो निष्पाप जीव
संकटे ही कधी सांगून येत नाहीत, असे म्हणतात़ पण संकटाची चाहूल मात्र लागत असते़ फक्त त्या वेळी सतर्क राहून खबरदारी घेतल्यास संकट टाळता आले नाही, तरी शेकडो निष्पाप जीव वाचविणे शक्य होते़ धोकादायक इमारतीच्या रूपाने असेच एक संकट गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर घोंघावत आहे़ मुंबईकरांचे दार ठोठावणारे हे संकट टाळण्यासाठी इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट होणे आवश्यक आहे़ या व अशा अनेक संकटांच्या वेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांच्याशी कॉफीटेबल अंतर्गत केलेली ही बातचीत...
इमारत धोकादायक झाल्यावरच का पावले उचलत नाहीत?
मुळात इमारतीचा आराखडा मंजूर करतानाच
स्ट्रक्चरल आॅडिटची अट आयओडीमध्ये (इन्टीमेशन
आॅफ डिसएप्रोव्हल) घालण्यात आलेली असते़ घर
खरेदी करताना आपण गार्डन फेसिंग व्ह्यू बघतो,
पार्किंगची सोय बघतो, पण बिल्डरने स्ट्रक्चरल
आॅडिट करून घेतले आहे का, हे विचारले जात नाही़
त्या इमारतीचा आपत्कालीन आराखडा आहे का,
अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित आहेत का, बांधकाम भूकंपप्रतिरोधक आहे का, अशा सुरक्षेच्या मुद्द्यांकडेच दुर्लक्ष केले जाते़ हा धोका ध्यानात घेऊन स्ट्रक्चरल आॅडिटची नियमावलीच तयार करण्यात येत आहे़ ही नियमावली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळताच निवासी सोसायटी, विभाग कार्यालय, अग्निशमन दल आणि आपत्ती नियंत्रण कक्षाकडे प्रत्येकी एक प्रत देण्यात येईल़ त्यानंतर त्याच्यावर अंमल होतोय का, यावर लक्ष ठेवणे शक्य होईल़
खेटून उभ्या असलेल्या इमारतींचे आव्हान कसे पेलता?
दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतीच काय तर लोकवस्तीही आपत्तीकाळात मदतकार्यात आव्हान ठरत असते़ यामुळे अनेक वेळा त्या संकटात सापडलेल्या पीडितांच्या जिवावर बेतू शकते़ याचे उदाहरण द्यायचे म्हणजे, कुलाबा येथील गीतानगर झोपडपट्टीमध्ये लागलेली आग़ त्या ठिकाणी एकापाठोपाठ एक सिलिंडरचे स्फोट होऊ लागल्याने त्या ठिकाणी शिरणेच एक आव्हान ठरले़ अशा वेळी जीवितहानी टाळण्यासाठी ताकाळ निर्णय घ्यावा लागतो़ त्यानुसार अग्निशमन दलाच्या गाड्या आत घुसविण्यासाठी अखेर बॅकबे बस आगाराची भिंत तोडावी लागली़ दुसरी घटना म्हणजे कफ परेड येथील मॉन्ट ब्लँक इमारतीमधील आगीची दुर्घटना़ इमारतीच्या आवारात वाहनांच्या वेड्यावाकड्या पार्किंगमुळे त्या ठिकाणी आगीचे बंब पोहोचणेच जिकिरीचे ठरले़ काळबादेवी येथील आगीच्या घटनेवेळी त्या परिसरात बांधून ठेवलेल्या हातगाड्यांमुळे इमारतीपर्यंत पोहोचता येत नव्हते़ परिणामी या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले़
अशा दुर्घटनांच्या ठिकाणी तत्काळ मदत कशी पोहोचविता?
भौगोलिक माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने दुर्घटनाग्रस्त इमारतीचे ठिकाण, तिची उंची, आसपासच्या परिसरात असलेले अग्निशमन केंद्र, रुग्णालय, विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, इमारतीमधील खोल्या, रहिवाशांची संख्या, निवासी अथवा व्यावसायिक अशी सर्व माहिती
तत्काळ उपलब्ध होते़ त्यानुसार त्या दुर्घटनेची व्याप्ती लक्षात घेऊन मदतकार्य पोहोचविले जाते़ त्याचबरोबर इमारतीचा आपत्कालीन आराखडा तयार ठेवण्यावर अधिकाधिक भर आता दिला जात आहे़ उच्च न्यायालयाच्या इमारतीचा आपत्कालीन आराखडा नुकताच तयार करण्यात आला़ त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या अक्षरश मागे लागून ४५० शाळांचा आपत्कालीन आराखडा तयार करून घेण्यात आला आहे़ असे आराखडे सर्वच इमारतींचे असावे, यासाठी नागरिकांना जागरूक करीत आहोत़
नागरिकांना सतर्क करण्यासाठी कोणते उपक्रम सुरू आहेत?
मदतीचे दोन प्रकार असतात तत्काळ मदत आणि मदतीचा दर्जा़ मदतीसाठी धावून जाणारे अनेक असतात़ मात्र मदत कशी करावी, याचे ज्ञान त्या व्यक्तीला नसल्यास पीडितांसाठी ती मदतही धोकादायक ठरू शकते़ त्यामुळे प्रथमोपचार कसा करावा, संकटकाळात कोणती खबरदारी घ्यावी, मदतकार्य कसे करावे, याची माहिती आपत्कालीन
नियंत्रण कक्षामार्फत विनामूल्य देण्यात येते़
अशा कार्यशाळा इच्छुक नागरिकांसाठी भरविण्यात येतात़ राष्ट्रीय सेवा योजनेतील ६० हजार विद्यार्थ्यांना असे प्रशिक्षण देण्यात आले़ गणेशोत्सव काळात मंडपात आग लागण्याच्या घटना अधिक घडतात़ त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक मंडळांच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे़ परिणामी आगीचे प्रमाण खूप कमी झाले आहे़ नागरिकांना मार्गदर्शन करणाऱ्या २० चित्रफितीही संकेतस्थळावर टाकण्यात आल्या आहेत़ तसेचdisaster management (mcgm) लोकांनी डाऊनलोड करावे, त्यात अनेक महत्त्वाची माहिती मिळू शकेल़ मानसिकता बदलण्याचे कार्य करीत आहोत़ मात्र यात नागरिकांचे योगदान मिळत नाही, तोपर्यंत आमच्या प्रयत्नांचा उपयोग नाही़
इमारतींप्रमाणेच धोकादायक वृक्षही मृत्यूचा सापळा ठरत आहेत़
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी वृक्षांचे सर्वेक्षण करून त्यातील धोकादायक वृक्ष अथवा धोकादायक फांद्या तोडण्यात येतात़ मात्र खासगी परिसरातील वृक्ष पडण्याचे प्रमाण अधिक आहे़ खासगी आवारातील वृक्षांच्या धोकादायक फांद्या छाटणे आवश्यक आहे़ मात्र याकडेच दुर्लक्ष केले जाते़ या वेळी पहिल्यांदाच वृक्षांची गणना ग्लोबल पोझिशिनिंग सिस्टम (जीपीएस) आणि भौगोलिक माहिती पद्धतीद्वारे होत आहे़ यामुळे प्रत्येक वृक्षाची नोंद नकाशावर येणार असून दुर्मीळ वृक्ष, वृक्षांचे प्रकार, धोकादायक वृक्ष, वृक्षांची उंची, वय, घेर व शास्त्रीय नाव अशी २५ प्रकारची माहिती संकलित होणार आहे़ हा अहवाल सहा महिन्यांत सादर होणार आहे़
दरड परिसरात कोणती काळजी घेतली जाते?
दरड परिसर हा म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येत असतो़ दरड कोसळू नये यासाठी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे़ या ठिकाणी बेकायदा वस्तीच अधिक आहे़ पण ही जागा पालिकेची नसल्याने या ठिकाणी फक्त नोटीस पाठविण्याचे काम पालिका करू शकते़ मानवतेच्या दृष्टिकोनातून वीज व पाणीपुरवठा खंडित करता येत नाही़ नोटीस देऊनही रहिवासी स्थलांतरित होत नाही़ त्यामुळे स्वत:च्या जोखमीवर त्या ठिकाणी राहत असल्याचे शपथपत्र या नागरिकांकडून घेण्यात येते़
जैविक व रासायनिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नियंत्रण कक्ष सज्ज आहे का?
अशा आपत्तीमध्ये बचावकार्य सुरू करता येईल़ त्या ठिकाणाहून लोकांचे स्थलांतर आदी सर्व झटपट सुरू होईल़ पण अणुकिरणोत्सर्ग निकामी करण्याची यंत्रणा आपल्याकडे नाही़ यात आपण मागे पडत आहोत़ परंतु यावर अभ्यास सुरू आहे़
- मुलाखत : शेफाली परब-पंडित