एका संघर्षाचा अस्त...

By admin | Published: May 19, 2015 01:55 AM2015-05-19T01:55:23+5:302015-05-19T01:55:23+5:30

अरुणा शानबाग यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला आणि ४२ वर्षांचा संघर्षमय प्रवास थांबला

A struggle | एका संघर्षाचा अस्त...

एका संघर्षाचा अस्त...

Next

मुंबई : अरुणा शानबाग यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला आणि ४२ वर्षांचा संघर्षमय प्रवास थांबला. या वृत्ताने त्यांची आई, बहीण किंवा जवळच्या, रक्ताच्या नातलगाप्रमाणे ४२ वर्षे अहोरात्र सेवा करणारे केईएम रुग्णालय हळहळले, अस्वस्थ झाले.
१९७३ साली अरुणा याच केईएम रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होत्या. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी सहकाऱ्यांसोबतच रुग्णांचीही मने जिंकली होती. मात्र २७ नोव्हेंबर १९७३ची रात्र अरुणा यांच्यासाठी काळरात्र ठरली. दुसऱ्या पाळीतले काम आटोपून अरुणा घरी जाण्यासाठी निघाल्या. कपडे बदलण्यासाठी त्या बेसमेन्टमध्ये
गेल्या. तेथे आधीपासूनच सोहनलाल वाल्मिकी हा वॉर्डबॉय दबा
धरून होता. अरुणा येताच त्याने त्यांच्यावर झडप घातली. कुत्र्याच्या गळ्यात बांधल्या जाणाऱ्या साखळीने त्याने अरुणाचा यांचा गळा आवळला. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार केले. चेनने घट्ट
आवळल्याने अरुणा यांच्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अचानक झालेल्या या आघाताचा जबर धक्का अरुणा यांना बसला आणि त्या कोमात गेल्या.
सर्वाेच्च न्यायालयाने अरुणा यांचे पालकत्व केईएम रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार रुग्णालयातील नर्स, डॉक्टर आणि अन्य स्टाफ अत्यंत आत्मीयतेने त्यांचा सांभाळ करीत होता. त्यामुळे अरुणा यांच्यासोबत या ना त्या कारणाने जोडलेल्या रुग्णालयातल्या प्रत्येकाला धक्का बसला. अरुणा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांनी रुग्णालय गाठले. त्यांना पाहून नर्स अस्वस्थ झाल्या. इतकी वर्षे अरुणा यांचे पालकत्व स्वीकारून त्यांचा सांभाळ केलेल्या केईएम रुग्णालयानेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले पाहिजेत, असा आग्रह नर्सनी केला. यानंतर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे आणि अरुणांच्या नातेवाइकांनी मिळून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. डॉ. सुपे आणि अरुणाचा भाचा विनायक नायक या दोघांनी मिळून गौड सारस्वत ब्राह्मण पद्धतीने अरुणावर अंत्यसंस्कार केले.
भोईवाडा येथील हिंदू स्मशानभूमीत अरुणा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुणा यांच्या निधनानंतर केईएम कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याने सर्वांना गहिवरून आले होते. दुपारी तीन वाजता केईएम महाविद्यालय इमारतीच्या तळमजल्यावर अरुणा यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. या वेळी ‘अरुणा शानबाग अमर रहे!’ अशा घोषणा परिचारिका देत होत्या. सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, महापालिका आयुक्त अजय मेहता, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. संजय ओक, अभिनेत्री स्मिता तांबे आदी अरुणाच्या अंत्यदर्शनासाठी आले होते.

13मे रोजी अरुणा यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे लक्षात आल्यवर त्याना अति दक्षता विभागात हलवण्यात आले. त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या ६ दिवसांमध्ये त्यांच्या प्रकृतीत चढउतार होत होते. डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण अखेर अरुणा यांनी जगाचा निरोप घेतला.

1973
साली वार्डबॉय सोहनलाल याने अरुणावर अत्याचार केला. सोहनलालने अरुणांचा गळा कुत्र्याच्या चेनने आवळल्याने त्यांच्या मेंदूच्या काही भागाचा रक्तपुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. यानंतर त्या काही काळासाठी कोमात गेल्या होत्या. अरुणांनी बोलण्याची क्षमता गमावल्यामुळे त्या कधीच दु:ख बोलू शकल्या नाहीत.

अरुणा
यांचा असा होता दिनक्रम
वाजता अरुणा यांचा दिवस सुरू व्हायचा. आदल्या दिवशी रात्रपाळीला असलेल्या परिचारिका सकाळी साडेसहा वाजता त्यांची तयारी करायच्या. त्यांचे स्पंजिंग केले जायचे़ त्यांचे कपडे बदलून, केस विंचरून त्यांना तयार करण्यात यायचे. सकाळच्या पाळीच्या परिचारिका यायच्या आधी अरुणा
यांची तयारी झालेली असायची.

त्यांना नाश्ता देण्यात यायचा. नाश्त्यामध्ये त्यांना वेगवेगळे पदार्थ दिले जायचे. आठवड्यातून एकदा तरी परिचारिका त्यांना घरून नाश्ता बनवून आणायच्या.

सुमारास अरुणा यांना जेवण दिले जायचे. जेवणात त्यांना मासे असले की आवडायचे. यामुळे काही परिचारिका फिश करी बनवून आणायच्या.

अरूणाचा वाढदिवस १ जूनला असायचा. अरूणाचा वाढदिवस म्हणजे केईएम रुग्णालयात एक सोहळाच असायचा. १५ दिवस आधीपासून तिच्या वाढदिवसाची तयारी केली जायची. तिची खोली या दिवशी सजवली जायची. खोलीचे पडदे बदलेले जायचे. वातावरण प्रसन्न वाटले पाहिजे यासाठी खोलीत फुले ठेवली जायची.

अरुणाचा मृत्यू झाला हे ऐकून खूप दु:ख झाले. तिची परिचारिका खूपच चांगल्या पद्धतीने आपुलकीने काळजी घ्यायच्या. परिचारिका कशा असाव्यात याचे केईएममधील परिचारिका हे उत्तम उदाहरण आहे. अरुणाला नैसर्गिक मृत्यू आला. तिला संवेदना होत्या. कधी कधी ती हसायची, तर कधी ती आक्रस्थाळेपणा करायची. ती आपल्याकडे पाहायची की नाही हे सांगू शकत नाही. तिची नजर शून्यात असायची. -डॉ. संजय ओक, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

अरुणावर अत्याचार झाल्यानंतर ती बरी व्हावी म्हणून तिच्यावर उपचार करण्यात आले. तिच्यासाठी फिजिओ थेरपी सुरू करण्यात आली होती, पण त्याचा तिला फायदा झाला नाही. कालांतराने तिच्यावर केले जाणारे उपचार बदलण्यात आले. अरुणा ही कोमात नव्हती, ती व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये होती. तिच्या काही संवेदना जिवंत होत्या. तिला आंबा, बर्फी, मासे हे पदार्थ आवडायचे. काही वेळा काही गोष्टी तिला आवडल्या असतील की नाही हे समजायचे नाही.
- डॉ. प्रज्ञा पै,
माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

अरुणाने दिला इच्छामरणाचा पर्याय -पिंकी विरानी
शानबाग यांचे व्यक्त न होणार दु:ख बघून विरानी यांनी त्यांच्या इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने विचारमंथन करून कायद्याचा पर्याय चाचपून काही अटींवर इच्छामरणाला संमती दिली. डेड ब्रेन रुग्णालाच हा पर्याय देता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र याला केईम रुग्णालयातील परिचारिकांनी विरोध केला. त्यामुळे जेव्हा केव्हा परिचारिका व कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन होईल तेव्हा इच्छामरणासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज करा, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगून ठेवले होते. पण अरुणा यांची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांचे मतपरिवर्तन झाले नाही.

इच्छामरणाचे ‘कलात्मक’ प्रतिबिंब !
‘त्या’ घटनेवर आधारित ‘अरुणा ६७’ हा सिनेमा लवकरच येतो आहे. यापूर्वी साहित्य, नाटक आणि सिनेमांच्या माध्यमातून इच्छामरणाचा विषय चर्चेत राहिला आहे.

पिंकी विरानी यांनी ‘अरुणाज स्टोरी’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा मीना कर्णिक यांनी ‘अरुणाची गोष्ट’ मराठी भाषेत अनुवाद केला. मंगला आठल्येकर यांचे ‘जगण्याची सक्ती आहे म्हणून’ हे पुस्तक या विषयावर आधारित आहे.

डॉ. आनंद पाटील यांनीही ‘इच्छामरण’ या कादंबरीत अडाणी आजीच्या इच्छेनुसार तिच्या मरण सोहळ््याचे केलेले वर्णन आहे. बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ‘गुजारिश’, तर मराठीत संजय सुरकर यांनी सुखांतमधून हा विषय मांडला होता.

अरुणाच्या आत्म्याला शांती लाभो
अरुणा यांच्या निधनाने आपल्याच परिवारातील एक व्यक्ती गेल्याचे दु:ख झाले. ज्या अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला अरुणा यांना तोंड द्यावे लागले व ज्या परिस्थितीत त्यांना उर्वरित आयुष्य कंठावे लागले, ते केवळ हृदय पिळवटणारे व संपूर्ण समाजाला विषण्ण करणारे होते. अरुणा यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना करतो. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल

लढा अजरामर राहील
परिचारिकेच्या रूपात आयुष्यभर रुग्णसेवा करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या अरुणा शानबाग यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णशय्येवर खर्ची पडावे, हा नियतीचा कूर खेळच म्हणावा लागेल. नियतीने जणू आयुष्यभर त्यांची परीक्षा पाहिली आणि त्या तितक्याच लढवय्येपणाने नियतीशी झुंज देत राहिल्या. अरुणा शानबाग यांच्या निधनाने हा संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. त्यांचा हा लढा अजरामर राहील.
- अशोक चव्हाण,
अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

मन विषण्ण झाले
४२ वर्षे संघर्ष करणाऱ्या अरुणा शानबागच्या निधनाने केवळ एक व्यक्ती गेली नाही, तर परिस्थितीशी झगडणाऱ्या एका जिद्दीची ही कहाणी होती. तिला बरे करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारा केईएमचा स्टाफ या दोघांचे नाते खूप वेगळे होते. केईएमच्या स्टाफने अरुणा बरी व्हावी यासाठी जे प्रयत्न केले, त्याला इतिहासात तोड नाही. मृत्यूशी झुंजणारी करुणा आणि त्याचबरोबर तिची अहोरात्र सेवा करणारा कर्मचारी वर्ग या दोघांच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. अरुणाला शेवटी त्याच अवस्थेत जीव सोडावा लागला, हे मन विषण्ण करणारे आहे.
- रावसाहेब दानवे-पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष

माझा एक अंश संपला!
अरुणाच्या निधनाने माझ्यातील एक अंश संपल्याची भावना आहे. अरुणाच्या आयुष्यातील ‘त्या’ प्रसंगावर आधारित नाटकात अरुणाची भूमिका करीत असताना तिच्या सहकाऱ्यांशी बोलणे झाले होते. अरुणाच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभाच इतका भिडला होता, त्यामुळे भूमिका करताना त्यात अधिक सहजता निर्माण झाली. शिवाय विनय आपटे यांच्या दिग्दर्शनामुळे बारीकसारीक गोष्टींवर विशेष लक्ष असायचे. नाटकात काम करताना एका तालमीच्या वेळी विनय काकांनी खास डॉ. रवि बापट यांना बोलावले़ त्यांनीही आमच्याशी संवाद साधून या भूमिकेला अधिक जिवंत केले. पण आता अरुणा आपल्यातून कायमची निघून न जाता माझ्यात खोल कुठेतरी विलीन झाल्यासारखी वाटते आहे.
- चिन्मयी सुमित, अभिनेत्री

अरुणा शानबाग यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, अशी मी प्रार्थना करते.
- सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी

अरुणा शानबाग यांचा अनेक दशकांचा दु:खद प्रवास पाहता पुरुषांची मानसिकता तातडीने बदलण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
-विनय सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष, भाजपा

अरुणा शानबाग यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फ्लॉरेन्स नाइंटिंगल अ‍ॅवॉर्ड, पहिले पुरस्कर्ते - केईएम रुग्णालयाच्या परिचारिका, ४२ वर्षांची नि:स्वार्थी सेवा. - शोभा डे, लेखिका

न्याय कोठे आहे? अरुणाचे आज ४२ वर्षे कोमात गेल्यावर निधन झाले आणि तिच्यावर बलात्कार करणारा मात्र मोकळा आहे.
- विशाल डडलानी, संगीतकार

४२ वर्षांचा वेदनादायक प्रवास आता संपला आहे. अरुणाच्या केईएममधील सहकाऱ्यांना मी सलाम करते. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. - कविता कल्वकुंतला, खासदार, टीआरएस

४२ वर्षे आयुष्याशी लढल्यानंतर ती गेली. अरुणा आपल्यातून गेली आहे, तिच्या आत्म्याला शांती मिळो.
ऋषी कपूर, अभिनेता

 

Web Title: A struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.