शिक्षणासाठीच्या संघर्षाला मिळाले बळ

By admin | Published: March 7, 2017 01:01 AM2017-03-07T01:01:04+5:302017-03-07T01:01:04+5:30

शिक्षण घेण्याची तीव्रइच्छा असल्याने तिने स्त्री शिक्षणासाठी काम करणाऱ्या पुण्यातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला.

The struggle for education took the strength | शिक्षणासाठीच्या संघर्षाला मिळाले बळ

शिक्षणासाठीच्या संघर्षाला मिळाले बळ

Next


पुणे : शिक्षण घेण्याची तीव्रइच्छा असल्याने तिने स्त्री शिक्षणासाठी काम करणाऱ्या पुण्यातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला. स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची जिद्द उराशी बाळगून दहावी परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. मात्र, काळाने घाला केला अन् तिच्या डोक्यावरचे मातेचे छत्र नाहीसे झाले. याचा गैरफायदा घेऊन एका नातेवाइकाने तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. या अनपेक्षित घटनांमुळे तिची वर्गातील उपस्थिती कमी पडली. परंतु, राज्य मंडळाने तिच्या संघर्षाची दखल घेऊन वैशाली कानगुडे (नाव बदलले आहे) या विद्यार्थिनीला परीक्षेस बसण्याची परवानगी देऊन भरारी घेण्यासाठी पंखांना बळ दिले आहे.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गात नियमितपणे येऊन मन लावून अभ्यास करावा.
शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनातून विविध विषयांच्या संकल्पना समजून घ्याव्यात. त्यामुळे शाळेच्या आणि राज्य मंडळाच्या निकालातही वाढ होईल, या उद्देशाने दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली.
वर्गातील हजेरी ७५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जात नाही. परंतु, काही अपरिहार्य कारणांमुळे शाळेत जाणे शक्य न झाल्यास परीक्षेस बसण्यासाठी मंडळाकडून किंवा विभागीय मंडळाकडून परवानगी दिली जाते. त्यासाठी शाळेकडून पाठपुरावा करावा लागतो. वैशालीची शिक्षणाबाबतची ओढ पाहून कर्वेनगर येथील
शिक्षण संस्थेने पुढाकार घेत पुणे विभागीय मंडळाकडे पाठपुरावा केला. त्याचा सकारात्मक परिणाम होऊन तिला परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी देत असल्याचे महामंडळाकडून सोमवारी स्पष्ट करण्यात आले.
कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या वैशालीच्या आईचे निधन झाल्याने तिची मावशी काही दिवसांसाठी तिला घरी घेऊन गेली. मात्र, तीन दिवसांच्या अवधीसाठी घरी गेलेली वैशाली परत न आल्याने संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. काही केल्या संपर्क होत नव्हता. त्यात काही महिन्यांचा कालावधी उलटला.
संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी वैशालीशी संपर्क साधून तिला पुन्हा वसतिगृहात घेऊन येण्याबाबतच्या हालचाली सुरूच ठेवल्या होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आईच्या निधनानंतर वैशालीच्या एका जवळच्या नातेवाइकाने तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला. तिच्याबरोबर लग्न लावून दिले नाही तर तिला वसतिगृहातून पळवून लग्न करेन, अशी धमकीच दिली. त्यामुळे वैशाली आणि तिची मावशी अहमदनगर येथे काही दिवस लपून राहिल्या. संस्थेच्या कर्मचाऱ्यांशी वैशालीच्या मावशीचे बोलणे झाले. तिने वैशाली वसतिगृहात का येऊ शकली नाही, याबाबतची करुण कहाणी सांगितली. त्यातून हा प्रकार समोर आला.
>एक मुलगी कौटुंबिक कारणांमुळे वर्गात उपस्थित राहू शकली नाही. याबाबत कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने संबंधित मुलीला परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात यावी, असा पत्रव्यवहार केला. मुलीला शिक्षण घेण्याची इच्छा असल्यामुळे तिला परीक्षेस बसण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- बबन दहिफळे, सचिव, पुणे विभागीय शिक्षण मंडळ

Web Title: The struggle for education took the strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.