झाडं जगविण्यासाठी धडपड
By admin | Published: June 5, 2017 01:17 AM2017-06-05T01:17:27+5:302017-06-05T01:17:27+5:30
घरची परिस्थिती जेमतेमच, आपल्या सलूनच्या व्यवसायातून जेवढे मिळेल त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : घरची परिस्थिती जेमतेमच, आपल्या सलूनच्या व्यवसायातून जेवढे मिळेल त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. स्वत:च्या कामातून वेळ काढून गावातील गरीब, निराधार आणि ज्येष्ठ नागरिकांची दाढीडोकी मोफत करून सामाजिक बांधिलकी जपायची आणि महत्त्वाचं म्हणजे मागील ५ वर्षांपासून गावात लावलेल्या आणि नैसर्गिकरीत्या आलेल्या झाडांना जगवायचं आणि त्यांचं पोटच्या पोराप्रमाणे संगोपन करायचं हे वर्णन वाचायला आणि ऐकायला चांगलं वाटतं पण दरवर्षी ऐन उन्हाळ्यात झाडांना डोक्यावरून पाणी आणून ही झाडं जगविणारा खोडद (ता.जुन्नर) येथील जालिंदर शिवराम कोरडे ऊर्फ जालुभाऊ या पर्यावरण मित्राची ही धडपड आहे. त्यांच्या कार्यामुुळे त्यांना या परिसरातील नागरिकांनी ‘वृक्षमित्र’ पदवी प्रेमाने बहाल केली आहे.
खोडद गावातील आणि मैदानाच्या बाजूने असणाऱ्या १ हजार झाडांना जालुभाऊ यांनी मागील ५ वर्षे उन्हाळ्यात एकट्याने डोक्यावरून पाणी आणून या झाडांना
घातले आहे. खोडदमध्ये कडुलिंब, कवठ, पिंपळ, वड, चिंच, नारळ, फायकस कदंब आदी झाडं आहेत. चालू वर्षी या झाडांची संख्या १२००च्या वर गेली आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत यांनी लावलेली झाडं आणि याशिवाय नैसर्गिकरीत्या उगवलेली कडुलिंब, चिंच, कवठ, वड, पिंपळ या झाडांचे देखील जालुभाऊ यांनी अगदी उत्तमरीत्या संगोपन करून जगविले आहे.
चालूवर्षी सर्व झाडांना ठिबक सिंचन करण्यात आले आहे. ठिबक सिंचन केले असले तरी उन्हाळ्याच्या दिवसांत या परिसारत पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवते. एकटाच पाणी आणून या झाडांना घालतो. या सर्व झाडांपैकी १ हजार झाडं ही आता सक्षम झाली आहेत.
शासनाच्या आणि वनविभागाच्या वतीने झाडं लावण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन करण्याच्या कार्यक्रमांसाठी कोट्यावधी रुपये
खर्च केले जातात. मात्र एखादा
माणूस प्रत्यक्ष झाडं जगविण्याचा आणि पर्यावरण वाचविण्याचा प्रयत्न करत आहे.
देवाला शोधायचे असेल तर देव झाडांमध्ये शोधावा कारण झाडं प्राणवायू देऊन आपला जीव वाचवत असतात. झाडं हे परमेश्वराचंच एक रूप आहे. झाडांमध्येच परमेश्वराचे दर्शन होईल. जगदगुरू राष्ट्रसंत संत तुकोबारायांनीदेखील पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला आहे. आपण मात्र त्याकडे काणाडोळा करतो. झाडं जगविताना मला साक्षात परमेश्वराचीच सेवा केल्याचा आनंद मिळतो.
- जालुभाऊ कोरडे, वृक्षमित्र