संघर्षाची अपंगत्वावर मात!

By admin | Published: January 2, 2015 12:51 AM2015-01-02T00:51:38+5:302015-01-02T00:51:38+5:30

अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही.

The struggle to overcome the disability! | संघर्षाची अपंगत्वावर मात!

संघर्षाची अपंगत्वावर मात!

Next

नागपूर : अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जयसिंह चव्हाण होत. जयसिंह चव्हाण यांनी आपल्या अपंगत्वावर मात केली आणि आज कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले. दुसऱ्याच्या मदतीशिवाय जे कधी काळी उभे राहू शकत नव्हते, ते आज शेकडो लोकांचे पालनहार बनले आहेत.
जयसिंह चव्हाण हे केवळ ३६ वर्षाचे आहेत. जयसिंह हे जन्मजात अपंग नव्हते. वयाच्या दीड वर्षापर्यंत ते अगदी ठणठणीत होते. परंतु डॉक्टरने दिलेल्या एका चुकीच्या इंजेक्शनची रिअ‍ॅक्शन झाली आणि त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत ते घराबाहेर पडले नाही. इतवारीतील घराच्या गॅलरीमधून ते लोकांना पाहत असत. लहान मुले खेळताना बघितली की त्यांनाही खेळावेसे वाटायचे परंतु इलाज नव्हता.
गणेशोत्सवादरम्यान एकदा वस्तीमध्ये संगीतखुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात जयसिंह यांनीही भाग घेतला. त्यांच्या दोन्ही हात आणि अधू झालेल्या पायांमधून रक्त वाहू लागले होते. मात्र शेवटी त्यांनी ही स्पर्धा जिंकली. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला.
तेव्हापासून त्यांनी मागे वळू पाहिले नाही. आईने दिलेल्या २०० रुपयामधून त्यांनी कपडे धुण्याची पावडर तयार करण्याच्या कामापासून सुरुवात केली. आपल्या ट्रायसिकलवर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. त्याला ‘रंजना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीज’ असे आईचे नाव दिले. पाहता पाहता कोट्यावधी रुपयाची उलाढाल करणारा हा उद्योग बनला. इतरांनाही त्यांनी रोजगार दिला.
ते दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनले. परंतु त्यांचा लढा इथेच संपला नाही. २०१० साली त्यांच्या कंपनीत आग लागली आणि संपूर्ण कंपनी बेचिराख झाली. अशा वेळीही खचून न जाता त्यांनी नवीन उद्योग उभारणीस सुरुवात केली आणि आॅईल रिफायनरी इंडस्ट्रीज उभी केली. बुटीबोरीतील ही कंपनी आज कोट्यवधीची उलाढाल करीत आहे. ही कंपनी आज अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत असून जयसिंह हे आयकॉन बनले आहेत.

Web Title: The struggle to overcome the disability!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.