तंटामुक्तीचा आलेख घसरला !
By admin | Published: October 5, 2014 11:55 PM2014-10-05T23:55:13+5:302014-10-06T00:06:01+5:30
तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना विशेष पुरस्कार.
ब्रम्हानंद जाधव
मेहकर (अकोला) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाला मिळत असलेल्या प्रतिसादाचा आलेख दिवसेंदिवस घसरत असल्याचे चित्र आहे. तीन वर्षांत केवळ ३९३ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार मिळाला आहे.
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी राज्यभर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल असलेले खटले व नव्याने निर्माण होणारे तंटे सर्वसहमतीने मिटविण्यासाठी आणि सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची शांततेतून समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या हेतूने १५ ऑगस्ट २00७ पासून हे अभियान सुरू झाले. तंटामुक्त अभियानात विशेष कामगिरी करणार्या गावांना विकास कामांसाठी गृह विभागातर्फे पुरस्कार देण्यात येतात. सुरवातीला या मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला. पहिली तीन वर्षे पुरस्कार मिळविण्यासाठी राज्यातील सर्वच गावांमध्ये चढाओढ होती. मात्र त्यानंतर या अभियानाला विशेष सकारा त्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. २00७-0८ मध्ये २ हजार ३२८, २00८-0९ मध्ये २ हजार ८११ व २00९-१0 मध्ये ४ हजार २४९ म्हणजेच पहिल्या तीन वर्षांत एकूण ९ हजार ३८८ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला. ८७७ गावांना तंटामुक्तीचा विशेष पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांत तंटामुक्त अभियानास अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. २0१0-११ मध्ये ३ हजार ८२४, २0११-१२ मध्ये २ हजार ७१२ व २0१२-१३ मध्ये १ हजार ७४१ म्हणजेच मागील तीन वर्षांत एकूण ८ हजार २७७ गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, केवळ ३९३ गावांना तंटामुक्त विशेष पुरस्कार मिळाला आहे.