कॅन्सरग्रस्त महिलेचा न्यायासाठी संघर्ष
By admin | Published: June 9, 2017 02:36 AM2017-06-09T02:36:24+5:302017-06-09T02:36:24+5:30
कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या शिरवणेमधील दुकानावर पालिकेने नोटीस न देता कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या महिलेच्या शिरवणेमधील दुकानावर पालिकेने नोटीस न देता कारवाई केली आहे. मृत्यूशी झुंज देत असलेली महिला एक वर्षापासून न्यायासाठी पालिकेच्या पायऱ्या झिजवत आहे. धनदांडग्यांच्या तक्रारीवरून कारवाई करणारे प्रशासन महिलेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे.
शिरवणे गावातील मुख्य मार्केटमध्ये चंद्रशेखर अरुण सुतार या प्रकल्पग्रस्त नागरिकाने २००० पूर्वी रेल्वेच्या संरक्षण भिंतीला लागून दुकानाचे बांधकाम केले होते. त्यांनी २००३ मध्ये हे दुकान सलमान मोहम्मद बक्श मुझावर यांना ते विकले व त्यांच्याकडून नेहा राजेंद्र लालवानी यांनी ते विकत घेतले.
नेहा यांना कर्करोग झाल्याने त्यांच्यावर डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यांचे दुकान येथील एका व्यावसायिकाला हडप करायचे होते. त्याने दुकान विकत देण्याची मागणी केली, परंतु त्यांना नकार दिल्याने पालिका प्रशासनाला हाताशी धरून ते पाडण्याचा डाव आखण्यात आला. नेहा या मे २०१६ मध्ये रुग्णालयात उपचार घेत असताना कोणतीही नोटीस न देता १२ मे २०१६ रोजी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शिरवणेमधील दुकान पाडून टाकले.
दुकानात व्यवसाय करत असलेली व्यक्ती व परिसरातील जाणकारांनी अतिक्रमण विरोधी पथकाला मालक येथे उपस्थित नाहीत, तुम्ही नोटीसही दिली नसल्याने कारवाई करू नये अशी विनंती केली होती. परंतु मुळात कारवाई दुसऱ्यांच्या सांगण्यावरून व दुसऱ्या व्यावसायिकास फायदा करून देण्यासाठी असल्याने कोणाचेही न ऐकता कारवाई करण्यात आली. दुकान पाडल्याचे पाहून नेहा यांचा आजार बळावला असून न्याय मिळावा यासाठी त्या एक वर्षापासून पालिकेच्या कार्यालयामध्ये फेऱ्या मारत आहेत, परंतु निगरगट्ट प्रशासन त्यांना दाद देत नाही.
शिरवणेमधील दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नामधूनच नेहा यांच्यावरील कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही याच दुकानाच्या उत्पन्नामधून भागविला जात होता. परंतु ३० ते ४० दुकानांची मालकी असलेल्या बड्या व्यावसायिकाला लाभ मिळावा यासाठी या संकटग्रस्त कुटुंबाला नवीन संकटाच्या खाईमध्ये टाकण्यात आले आहे. शिरवणेमधील याच दुकानाच्या आजूबाजूला अजूनही अनधिकृत बांधकामे आहेत. फेरीवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असताना फक्त नेहा लालवानी यांच्या दुकानावर कारवाई करण्याचा उद्देश काय, असा प्रश्न या परिसरातील काही सुहृदयी प्रकल्पग्रस्त नागरिकांनीच उपस्थित केला आहे.
>एकच दुकान अनधिकृत कसे?
शिरवणे मार्केटमधील नेहा लालवानी यांच्या दुकानावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून ते पाडले आहे. परंतु या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून फक्त कॅन्सर रुग्णाचेच बांधकाम का पाडण्यात आले? ज्या दुकानदाराच्या सांगण्यावरून हे बांधकाम पाडण्यात आले त्यांच्या मालकीची जवळपास एक पूर्ण इमारत असून त्याला सीसी व ओसी नसताना कारवाई केलेली नाही.
रेल्वेची जागाही हडप करण्याचा डाव शिरवणेमधील पाडण्यात आलेल्या दुकानाच्या मागील बाजूला रेल्वेचा मोठा भूखंड हडप करण्याचा डाव आखला जात आहे. यासाठी गटाराला लागून पत्र्याचे कुंपण टाकून भूखंड अडविण्यात आला आहे. त्या भूखंडाकडे जाण्यासाठी रस्ता असावा यासाठी नेहा लालवानी यांचे दुकान पाडण्यात आल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी अप्रत्यक्षपणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचीच फूस असल्याचे बोलले जावू लागले आहे.
आम्ही कष्टाच्या पैशातून दुकान विकत घेतले. कॅन्सरचे उपचार घेण्यासाठी रुग्णालयात असताना पालिकेने नोटीस न देता कारवाई केली. आमच्यावर अन्याय झाला असून न्याय मिळावा यासाठी एक वर्ष पालिकेत फेऱ्या मारत आहेत. न्याय मिळाला नाही व जीवाचे काही बरेवाईट झाल्यास त्याला पूर्णपणे कारवाई करणारे अधिकारी, कर्मचारी जबाबदार असतील.
- नेहा राजेंद्र लालवानी,
पीडित महिला.