एसटीची 17 टक्के भाडेवाढ तत्काळ लागू; किमान तिकिटासाठी आकारणार जादा ५ रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:50 AM2021-10-26T07:50:39+5:302021-10-26T07:51:05+5:30
ST bus : एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली.
मुंबई : कोरोनामुळे आर्थिक डोलारा कोसळलेल्या एसटी महामंडळाने तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. ही भाडेवाढ सोमवारी मध्यरात्रीपासून लागू झाली. तिकीट दरात किमान ५ रुपयांनी वाढ होणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
इंधनाचे भरमसाट वाढलेले दर, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतीमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. सोमवारी मंजुरी मिळाल्यानंतर भाडेवाढीचा निर्णय लागू करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाढत्या इंधनाचा भार पेलत असताना दुसरीकडे महामंडळाच्या तिजोरीवरही त्याचा परिणाम जाणवू लागला असल्याने नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात आली. ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, अशा प्रवाशांकडून नव्या दरानुसार दरातील फरकातील रकमेची आकारणी केली जाईल, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार तर, कर्मचाऱ्यांना २५०० देण्यात येणार आहेत. याचा लाभ सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल. ऑक्टोबरचा पगारही नोव्हेंबरच्या १ तारखेला होईल.
खासगी ट्रॅव्हल्सची भरमसाट दरवाढ
एसटीचा प्रवास महागला असताना, खासगी ट्रॅव्हल्सनीही दरवाढ केल्याने खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. मुंबईहून औरंगाबाद, सातारा आणि कोल्हापूर मार्गावर सर्वाधिक दरवाढ आहे. ही वाढ ३०० ते ७०० रुपयांच्या घरात आहे. कोकणचा प्रवासही दोनशे रुपयांनी महागला आहे.
रातराणीच्या प्रवास भाड्यात दिलासा
एसटी महामंडळाने भाडेवाढ केली असली तरी, रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रुपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.
अशी असेल भाडेवाढ
नव्या तिकीट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ कि.मी.नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयांच्या पटीत असणार आहे.
नवे तिकीट दर
मार्ग सध्याचा दर नवीन दर तफावत
मुंबई-काेल्हापूर ₹ ४८५ ₹ ५६५ ₹ ८०
मुंबई-औरंगाबाद ₹ ७४० ₹ ८६० ₹ १२०
पुणे-अकोला ₹ ६१० ₹ ७१५ ₹ १०५
दादर-स्वारगेट (शिवशाही) ₹ ४५० ₹ ५२५ ₹ ७५