कर्नाटकात एसटीचे ‘जय महाराष्ट्र’

By admin | Published: June 2, 2017 03:56 AM2017-06-02T03:56:11+5:302017-06-02T03:56:11+5:30

‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाला परिवहन महामंडळाकडून (एसटी) जोरदार

ST's 'Jai Maharashtra' in Karnataka | कर्नाटकात एसटीचे ‘जय महाराष्ट्र’

कर्नाटकात एसटीचे ‘जय महाराष्ट्र’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यावर बंदी घालण्याच्या कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणाला परिवहन महामंडळाकडून (एसटी) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. एसटीच्या नव्या बोधचिन्हात ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश करण्यात आला असून, ते लवकरच एसटीच्या सर्व वाहनांवर दिसणार आहे. विशेष म्हणजे नवे बोधचिन्ह असलेली पहिली बस शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रल आगारातून बेळगावकडे रवाना करण्यात येणार आहे.
‘जय महाराष्ट्र’चा उद्घोष करीत जाणाऱ्या या पहिल्या एसटी बसला स्वत: परिवहन मंत्री दिवाकर रावते हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे कळते. तसेच या बसच्या चालक आणि वाहकाचा सातारा, सांगली आदी ठिकाणी गौरव करण्यात येणार आहे. गुरुवारी एसटीच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान ही माहिती मिळाली. परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई सेंट्रल येथील आगारात हा कार्यक्रम झाला.


‘शिवशाही’ अवतरली

तांत्रिक कारणांमुळे तब्बल दीड वर्ष रखडलेली ‘शिवशाही’ वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल करण्यात आली. दाखल झालेल्या या वातानुकूलित बसची सेवा १० जूनपासून सुरू करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत रत्नागिरीसह मुंबई, नागपूर, पुणे, नांदेड, शेगाव, शिरपूर, परभणी, जळगाव, लातूर, बीड या मार्गांवर टप्प्याटप्प्याने एसटीच्या स्वमालकीच्या १ हजार अत्याधुनिक शिवशाही धावणार आहेत. तसेच एसटीच्या शयन बसही लवकरच ताफ्यात येणार असल्याची माहिती या वेळी रावते यांनी दिली.

कर्मचाऱ्यांसााठी १ हजार घरे
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांसाठी वातानुकूलित सेवा आणि एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ‘एसटी क्वॉर्टर्स’ची घोषणा या वेळी करण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकारी वर्गासाठी १ हजार घरे कुर्ला येथे उभारण्यात येणार आहेत. या एसटी क्वॉर्टर्समध्ये शाळा, मॉल आणि अन्य सुविधांचाही समावेश करण्यात आल्याची माहिती रावते यांनी दिली.

‘आॅपरेशन शटल’

राज्यात आणि विशेषत: खेडेगावात अवैध वाहतूक बंद करण्यासाठी एसटी प्रशासनाच्या वतीने ‘आॅपरेशन शटल’ हा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ५० ते १३० किमी अंतरावरील दोन शहरे-खेडे किंवा गावांमध्ये एसटी शटल सेवा सुरू झाली. ठरावीक अंतराने दोन्ही बाजूंनी एसटी चालवण्यात आल्या. राज्यात १२ ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

शुक्रवारी मार्गस्थ होणार
‘जय महाराष्ट्र’या नवीन बोधचिन्हासह शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रल आगार येथून मुंबई-बेळगाव ही पहिली एसटी मार्गस्थ होईल. तिला परिवहन मंत्री दिवाकर रावते हे हिरवा झेंडा दाखवतील. या एसटी चालक, वाहकाचा सातारा, सांगली आणि सोलापूर येथे गौरव करण्यात येईल.


अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार
खासगी यंत्रणेच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटीची शिवशाही धावणार आहे. राज्यातील आगारांमध्ये अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी एसटी सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. हे अधिकारी माजी लष्कर अधिकारी असतील.


अत्याधुनिक ‘शिवशाही’

संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसमध्ये ४५ आसने आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी मोफत वाय-फाय देण्यात आले आहे. शिवाय एलईडी स्क्रीन, गाणी ऐकण्यासाठी हेडफोन सुविधा प्रत्येक आसनासाठी देण्यात आली आहे. मोबाइल-लॅपटॉप चार्जिंग पॉइंट, प्रवासात वाचन करण्यासाठी दिवा आणि पुशबॅक आसन व्यवस्थाही पुरविण्यात आली आहे.

 महिला चालकांसाठी ४५० अर्ज

एसटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. चालक-वाहक आणि अन्य पदांसाठी ही भरती असून, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरतीसाठी परीक्षा होणार आहे. यामध्ये महिला चालकांच्या पदांचादेखील समावेश असून, या पदासाठी ४५० महिलांचे अर्ज आले आहेत.

Web Title: ST's 'Jai Maharashtra' in Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.