एसटीची हंगामी भाडेवाढ उद्यापासून; प्रवास भाड्यात 10 टक्क्यांनी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 06:11 AM2018-10-31T06:11:09+5:302018-10-31T07:01:20+5:30
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे.
पुणे : दिवाळीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी)कडून राज्याच्या विविध भागात जादा बस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी वाढविण्यात आलेले दहा टक्के प्रवास भाड्याची अंमलबजावणी दि. १ नोव्हेंबरपासून होणार आहे. त्यानुसार पुणे विभागाने प्रवास भाडे निश्चित केले आहे.
दरवर्षीप्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत एस.टी ची सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ दि. १ ते २० नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी लागू असेल. मागील वर्षी याचकाळात सेवाप्रकार निहाय २०, १५ व १० टक्के अशी भाडेवाढ केली होती. ही भाडेवाढ भाडेवाढ दि. ३१ आॅक्टोबरच्या मध्यरात्री पासून लागू होईल. पुण्यातील शिवाजीनगर व स्वारगेट बसस्थानकातून विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बस सोडल्या जाणार आहेत. या बसचे दहा टक्क्यांनुसार जादा बस भाडे निश्चित करण्यात आले आहेत. एसटीकडून वातानुकुलित व्होल्वो, वातानुकुलित शिवशाही, निम आराम, साधी व रातराणी अशा बस सोडल्या जातील.
एसटीने दिवाळीनिमित्त १० टक्के प्रवासभाडे वाढविले आहे. ही भाडेवाढ दि. १ नोव्हेंबरपासून लागू होत आहे. पण काही बुकिंग आधीच्या दरानुसारच झाले आहे. बहुतेक जण दीड पट प्रवास भाडे आकारत आहेत. ट्रॅव्हल कंपन्यांनी एसटीच्या दीडपटच भाडे आकारावे. - बाळासाहेब खेडेकर,
अध्यक्ष, पुणे डिस्ट्रीक लक्झरी बस असोसिएशन
खासगी ट्रॅव्हल्सचे जादा भाडे
खासगी ट्रव्हल कंपन्यांना एसटीच्या प्रवास भाड्याच्या दीड पट भाडे आकारण्याची मुभा राज्य शासनाने दिली आहे. त्यानुसार बहुतेक ट्रव्हल्सकडून भाडे निश्चित करण्यात आले आहे. मात्र, काही ट्रॅव्हल्सकडूनअजूनही जादा भाडे आकारले जात आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून नुकतीच ट्रॅव्हल मालकांची बैठकही घेण्यात आली. त्यामध्ये नियमापेक्षा जादा भाडे न आकारण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
जादा भाडेदर आकारल्यास खासगी वाहनांवर होणार कारवाई
सरकारने ठरवून दिल्या प्रमाणे भाडे न आकारणाऱ्या प्रवाशी वाहनांवर मोटार वाहन कायद्या प्रमाणे कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिला.
दिवाळीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहनांचा वापर करतात. त्या काळात नेहमीच्या प्रवास शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारले जाते. त्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एसटी) अधिकारी आणि खासगी बस वाहतूकदारांची बैठक आरटीओ कार्यालयात बोलावण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने टप्पा वाहतूकीचे दर या पुर्वी जाहीर केले आहेत. त्यानुसार बससाठी येणाºया प्रति किलोमीटर खर्चापेक्षा ५० टक्क्यांहून असणार नाहीत. त्यानुसार कमाल भाडेदरही निश्चित करण्यात आले आहे.
खासगी बस वाहतुकदारांनी आॅनलाईन आरक्षण दर त्या पेक्षा अधिक दर्शविल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. भाडेदर नियमापेक्षा जास्त राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना खासगी प्रवासी वाहतूकदारांना दिली. नियमापेक्षा ज्यादा भाडेदर आकारल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली.