राज्यकर्त्यांना एसटीची ‘सेवा’ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 06:40 AM2017-01-18T06:40:05+5:302017-01-18T06:41:44+5:30

राज्यात १० महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आचारसंहिता लागू झाली

STs 'service' has been started | राज्यकर्त्यांना एसटीची ‘सेवा’ सुरूच

राज्यकर्त्यांना एसटीची ‘सेवा’ सुरूच

googlenewsNext

सुशांत मोरे,

मुंबई- राज्यात १० महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि आचारसंहिता लागू झाली असली तरी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीकडून राज्यकर्त्यांना बिनदिक्कतपणे ‘हायफाय’ सेवा पुरवली जात आहे व त्याचा लाभही राज्यकर्ते घेत आहेत. यात मुख्यमंत्री, परिवहनमंत्री व परिवहन राज्यमंत्र्यांचा समावेश असून त्यांच्या दिमतीला एसटीचा आलिशान वाहनांचा व चालकांचा ताफा असल्याची बाब समोर आली आहे. ही वाहने व चालक एसटी महामंडळाकडे आचारसंहिता काळात स्वत:हून जमा करणे किंवा महामंडळाने ती जमा करून घेणे गरजेचे असतानाही त्याची कुठलीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे एसटीकडूनच आता ही बाब पडताळून पाहिली जात आहे.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती व नागपूर अशा १० महानगरपालिका निवडणुकांची तारीख ११ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. आचारसंहिता काळात मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती व घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्री, खासदार, आमदार व कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येत नाही. यात सरकारी वाहने वापरण्यावरही बंधने आहेत. मात्र या नियमांना खुद्द मंत्र्यांकडूनच फाटा देण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी वाहने व चालक दिले जातात. सध्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या दिमतीला टोयोटा इटिआॅस,परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासाठी इनोव्हा तर परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या दिमतीलाही मुख्यमंत्र्यांप्रमाणेच गाडी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रत्येक वाहनांवर एसटीचा चालक देतानाच अतिरिक्त चालकही दिले आहेत. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासाठी तीन तर परिवहन राज्यमंत्री विजय देशमुखांसाठी एक अतिरिक्त चालक दिला आहे. नियमानुसार ही वाहने व चालक लोकप्रतिनिधींनी एसटी महामंडळाकडे स्वत:हून जमा करणे किंवा एसटी महामंडळाने ती जमा करुन घेणे आवश्यक असते.
एसटी महामंडळाच्या सचिव विभागाकडूनही तसा प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठवला जातो व तसा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. मात्र एसटीने व मंत्र्यांकडून त्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे.
काय म्हणते निवडणूक काळातील नियमावली
निवडणुकीवेळी प्रचारासाठी शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, सार्वजनिक परिवहन उपक्रमांच्या वाहनांचा वापर करता येत नाही.मंत्र्यांना निवडणुक कालावधीत त्यांच्या निवासस्थानापासून कार्यालयापर्यंत कार्यालयीन कामकाजासाठीच वाहन वापरता येईल. मंत्री त्यांच्या शासकीय भेटीची निवडणूक प्रचारकार्याशी सांगड घालू शकत नाही आणि निवडणूक प्रचार कार्यादरम्यान शासकीय यंत्रणेचा किंवा कर्मचारी वर्गाचा वापरसुद्धा करु शकत नाही.
>कोणाच्या नावावर कोणते वाहन व क्रमांक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-
एमएच 0६-बीएम-४५९३
परिवहन मंत्री दिवाकर रावते-एमएच 0६-एए-0९९0
परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख- एमएच 0६-बीएम-४६0१
>चालकही दिमतीला
मुख्यमंत्री, परिवहन व परिवहन राज्यमंत्र्यांच्या दिमतीला वाहने देतानाच अतिरिक्त चालकही देण्यात आले आहेत. यातील परिवहन राज्यमंत्र्यांसाठीचा अतिरिक्त चालक हा पुण्यातील भाजपाच्या एका आमदाराच्या दिमतीला असल्याचे समजते. त्याचप्रमाणे परिवहन मंत्र्याच्या खासगी सचिव, वैयक्तिक सचिवांकडे असलेल्या वाहनांवर एसटीचे अतिरिक्त चालक आहेत.
>आचारसंहिता काळात वाहने वापरू शकतात की नाही याची आम्ही माहिती घेऊ. एसटीकडून मुख्यमंत्र्यांसाठी देण्यात आलेले वाहन ते स्वत: वापरत नाहीत. तर त्यांच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. तरीही आम्ही या बाबी तपासून पाहू.
- रणजितसिंह देओल
(एसटी महामंडळ- उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक)

Web Title: STs 'service' has been started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.