कट्टर विरोधक उद्धव ठाकरे-नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर
By Admin | Published: June 21, 2017 02:14 PM2017-06-21T14:14:43+5:302017-06-21T14:20:30+5:30
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे ब-याचवर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - राजकारणात परस्परांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे ब-याचवर्षांनी एकत्र एकाच व्यासपीठावर येण्याचा योग जुळून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे 23 जूनला मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येऊ शकतात.
सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार आहेत तसेच सत्तेत शिवसेना भाजपा सोबत सहभागी असल्याने या भूमिपूजन कार्यक्रमाचे उद्धव यांना आमंत्रण आहे. राणे यांचे सुपूत्र नितेश राणे कणकवलीचे आमदार आहेत तर, नारायण राणे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. 2005 साली नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर काढल्यानंतर उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये प्रचंड संघर्ष झाला होता.
नारायण राणेंसोबत त्यावेळी काही आमदार, स्थानिक शिवसैनिक बाहेर पडले होते. राणेंनी त्यावेळी शिवसेनेला अनेक धक्के दिले होते. 2005 साली मालवणात झालेली पोटनिवडणूक प्रचंड गाजली होती. राणेंनी त्यावेळी माझ्यासमोर उभे राहणा-या शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा केला होता. त्यानुसार शिवसेना उमेदवार परशुराम उपरकर यांचा दारुण पराभव झाला होता. शिवसेनेला आपले डिपॉझिटही वाचवता आले नव्हते. त्यानंतर सिंधुदुर्गातून जवळपास शिवसेनेचे अस्तित्वच संपुष्टात आले होते.
तरीही शिवसैनिकांचा लढा सुरु होता.
अखेर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला. त्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेचे पुन्हा चांगले दिवस सुरु झाले. मध्यंतरी नारायण राणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. पण उद्धव कटुता इतक्या लवकर विसरतील का ? असा प्रश्न राजकीय पंडितांनी विचारला होता. 23 जूनला होणा-या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित असतील.