शिवसेनेची ‘खाऊसेना’ म्हणून खिल्ली
By admin | Published: February 13, 2017 04:08 AM2017-02-13T04:08:40+5:302017-02-13T04:08:40+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. त्यात जाहीर सभांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही जोर धरला
स्नेहा मोरे / मुंबई
महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगली आहे. त्यात जाहीर सभांमध्ये होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनीही जोर धरला आहे. भाजपा समर्थकांनी सोशल मीडियाच्या प्रचार रणनीतीवर आघाडी घेतली आहे. व्हिडीओंच्या माध्यमातून गतिमान आणि कल्पक प्रचार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सध्या एका यु-ट्यूब चॅनलवरून शिवसेनेला ‘लक्ष्य’ करीत त्यांची ‘खाऊसेना’ अशी टिंगल उडवली आहे. पालिकेतील भ्रष्टाचार आणि शिवसेनेवर घणाघाती आरोप करणाऱ्या या व्हिडीओज्मधून ‘जाग मतदार जाग, भ्रष्टाचाराने माजलाय वाघ’ असे म्हणत शिवसेनेला चिमटे काढले आहेत.
अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीत आता सोशल मीडियाच्या प्रचारात भाजपाने शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मागे टाकल्याचे दिसून येते आहे. एका यु-ट्यूूूब चॅनलवर अॅनिमेशनच्या माध्यमातून ‘खाऊसेना प्रोडक्शन’ अशी टीका करत पालिकेतील भ्रष्टाचार, खड्ड्यांची समस्या, विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब, पक्षातील घराणेशाही, हफ्तावसुली, पेंग्विन मृत्यू, आदित्यच्या बीएमडब्ल्यू कारचा अपघात, राणीबाग पुनर्विकास, नालेसफाई घोटाळा अशा विविध मुद्द्यांवर कार्टून्सच्या माध्यमातून जोरदार खिल्ली उडवली आहे. त्यात वाघाच्या कार्टूनच्या भूमिकेत शिवसेना आणि सिंहाच्या कार्टूनच्या भूमिकेत भाजपा दाखविण्यात आली आहे.