अपंग अक्षयची ‘आयएएस’ होण्यासाठी जिद्द
By admin | Published: February 5, 2017 12:37 AM2017-02-05T00:37:45+5:302017-02-05T01:22:30+5:30
पंखांना बळ गरजेचे : समाजाच्या दातृत्वाला मदतीचे आवाहन
संतोष तोडकर --कोल्हापूर आपल्या शारीरिक अकार्यक्षमतेवर मात करीत अपार कष्ट व जिद्दीच्या बळावर तो ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ‘भविष्यात स्वत:च्या पायावर उभा राहीन, तो आयएएस अधिकारी होऊनच...!’ असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो. त्याचे नाव अक्षय अजित पाटील. जन्मत:च अक्षयला मेनिंगोमायलोसिस (पाठीच्या मणक्यावरील ट्यूमर) या आजाराला सामोरे जावे लागले, पण म्हणून तो खचला नाही. त्याचा जन्म झाला आणि त्याच्या पाठीच्या मणक्याला गाठ (ट्यूमर) असल्याचे लक्षात आले. या गाठीत पाणी साचलेले. साहजिकच ही गाठ काढली नाही तर त्याच्या जिवाला धोका होता आणि काढली तर त्याला दोन पायांनी कायमचे अधू व्हावे लागणार होते. पालकांनी ही गाठ काढण्याचा निर्णय घेतला; मात्र त्याच वेळी भविष्यात अक्षयला स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्पही सोडला. एकेक इयत्ता पुढे जात अक्षयने दहावीची परीक्षा दिली आणि या परीक्षेत तो ८७.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. बारावीच्या परीक्षेतही ८४.६१ टक्के गुण मिळवून त्याने महावीर कॉलेजमध्ये दुसरा क्रमांक मिळविला.
अक्षय येथील हेल्पर्स आॅफ हॅँडिकॅप्डच्या समर्थ विद्यामंदिर संस्थेचा विद्यार्थी. अतिशय स्वयंप्रेरित असणाऱ्या अक्षयने इयत्ता पाचवीपासूनच इंग्रजीवर प्रभुत्व मिळविण्यास सुरुवात केली. त्यासाठी अवांतर वाचनावर व इंग्रजी संभाषणकला सुधारण्यावर भर दिला. त्याच्या ध्येयाची सुरुवात झाली ती इथूनच. त्यासाठी वर्तमानपत्रे वाचणे, चालू घडामोडींच्या नोंदी लिहून ठेवणे, आयएएस झालेल्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांची चरित्रे वाचणे असा त्याचा दिनक्रम सुरू झाला.
सध्या अक्षय राजाराम महाविद्यालयात बी.ए.च्या तृतीय वर्षात आहे. त्यासह रोज किमान सहा ते सात तास तो यू.पी.एस.सी.चा अभ्यासही करतो.
मूलभूत संकल्पना समजावून घेण्यासाठी तो विविध पुस्तके, संदर्भग्रंथांसाठी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा वापर करतो; परंतु अनेक महागडी पुस्तके विकतच घ्यावी लागतात. पदवीनंतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे, मुंबई या ठिकाणी जाण्याची त्याची इच्छा आहे. आजारावरील औषधोपचार या सर्व गोष्टींसाठी येणारा खर्च मोठा असून, त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत अक्षयच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे.
पाटील कुटुंबीयांची धडपड
हे कुुटुंब उचगाव (ता.करवीर) येथे राहते. अक्षयची आई गृहिणी असून छोटेसे दुकान चालविते; तर वडील खासगी कंपनीत कामाला आहेत. मुलाच्या आयएएस होण्याच्या स्वप्नांना बळ देत त्याला चांगले मार्गदर्शन मिळावे, पुस्तकांची खरेदी करता यावी यासाठी आपली भविष्यनिर्वाह निधी (पीएफ)ची रक्कमही त्यांनी खर्ची घातली आहे.
अक्षयमध्ये क्षमता असल्याचे त्याच्या प्रयत्नांवरून दिसते आहे. तो मनापासून अभ्यास करतो, कष्ट घेतो. तो नक्कीच त्याचे ‘आयएएस’ अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करील.
- शैलेंद्र पांडव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, युनिक अकॅडमी