अमली पदार्थांच्या तस्करांना अटक
By Admin | Published: May 16, 2017 02:29 AM2017-05-16T02:29:23+5:302017-05-16T02:29:23+5:30
अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कांदिवलीतून अटक करण्यात आलेल्या दुकलीपाठोपाठ गुन्हे शाखेने ७२ वर्षांच्या वृद्धासह पाच जणांना अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ तस्करीप्रकरणी कांदिवलीतून अटक करण्यात आलेल्या दुकलीपाठोपाठ गुन्हे शाखेने ७२ वर्षांच्या वृद्धासह पाच जणांना अटक केली. पाचही जण वसईचे रहिवासी आहेत, यापैकी चार गुन्हेगार हे अभिलेखावरील आरोपी आहेत.
कांदिवलीतील रहिवासी योगेश शहा (३०) आणि दीपक गुप्ता (३५) यांना यापूर्वी गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ने बेड्या ठोकल्या. दोघांकडून ५४ लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांच्यामागे मोठी लिंक असल्याची शक्यता तपास पथकाला होती. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तेव्हा सराईत गुन्हेगारांची नावे समोर आली. वसईचा ७२ वर्षांचा महेश रेणीलाल गांधी याच्याकडून या दुकलीने हा माल विकत घेतला होता. औषध बनविण्याच्या कंपनीत कामाला असलेला गांधी सेवानिवृत्त झाला होता. त्याने हा माल टेम्पोचालक हाशीम शेख (४२), सर्फराज सिद्दिकी (३४) यांच्याकडून घेतला होता. हाशीम आणि सर्फराजला यापूर्वी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुजरातमध्ये अटक झाली होती. तपासात आणखी दोघांची नावे समोर आली. त्यांनी हा माल शाहिद मेनन, हनीफ शेखकडून घेतल्याचे उघड होताच, त्यांनाही अटक झाली.
शाहिद व हनीफला पाच वर्षांपूर्वी पाच किलो एमडीसह अटक केली होती. तेव्हा एमडीचा समावेश अमली पदार्थांमध्ये झाला नसल्याने त्यांची सुटका झाली होती. या प्रकरणी आणखी बडे मासे अडकण्याची शक्यता असून, त्यानुसार गुन्हे शाखा तपास करत आहे.