बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक
By admin | Published: January 17, 2017 01:39 AM2017-01-17T01:39:00+5:302017-01-17T01:39:00+5:30
आळेफाटा पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत रंगेहाथ पकडल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी येथे घडली
आळेफाटा : बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यास आळेफाटा पोलिसांनी ग्राहक बनून सापळा रचत रंगेहाथ पकडल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील आळेखिंडी येथे घडली. या कारवाईत पोलिसांनी तीन ते चार लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले आहे. मात्र या वेळी चारपैकी तिघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आळेफाट्याच्याजवळील आळेखिंडी येथे बिबट्याचे कातडे विक्रीस काही जण आले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना सोमवारी दुपारी दोनच्या वेळेला मिळाली. पोलिसांनी ग्राहक बनून संबंधितांशी संपर्क साधाला असता त्यांनी आळेखिंडी येथे येण्याचे सांगितले. आळेफाटा पोलीस ठाण्याचे नीलेश कारखिले व महेश काठमोरे आळेखिंडी येथे गेले व चार जणांनी तेथील जंगलात लपवून ठेवलेले बिबट्याचे कातडे आणले. या बिबट्याच्या कातड्याची चार लाख रुपये किंमत देण्याची मागणी करण्यात आली. मात्र याचवेळी पोलिसांनी खाक्या दाखवला. या वेळी झटापट झाली, मात्र तिघे जण पळून गेले. पोलिसांनी एकाला ताब्यात घेत बिबट्याचे कातडे जप्त केले.
दरम्यान, पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ताब्यात घेतलेल्याचे नाव अजय छगन केदार (वय २०, रामकडेबोटा, ता. संगमनेर) आहे. दीपक जाधव व इतर दोघे अशी पळालेल्या आरोपींची नावे असल्याचे समजले. हे सर्व जण शेजारच्या संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरातील आहेत. याबाबत पोलिसांनी वनविभाग कर्मचारी यांना आळेफाटा पोलीस ठाण्यात बोलावत बिबट्याच्या कातड्याची खातरजमा केली. याबाबत माहिती आळे वनपरिक्षेत्र कार्यालयास देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.