पाणवठ्यात विष मिसळताना अटक
By admin | Published: June 6, 2016 03:31 AM2016-06-06T03:31:16+5:302016-06-06T03:31:16+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील पाणवठ्यात विष मिसळताना सात शिकाऱ्यांना गस्तीवरील व्याघ्र अधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे
नरेंद्र जावरे, परतवाडा (अमरावती)
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रातील पाणवठ्यात विष मिसळताना सात शिकाऱ्यांना गस्तीवरील व्याघ्र अधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी रंगेहात पकडल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी एक सर्पगरुड मृतावस्थेत आढळून आला तर शिकाऱ्यांजवळून ह्ययुरियाह्ण व कुऱ्हाडीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील वैराट ‘पंचबा’ भागात व्याघ्र अधिकारी व स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सचे जवान गस्तीवर होते. अतिसंरक्षित क्षेत्रात मनाई असताना दोघे जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे त्यांना आढळले. त्यांना ताब्यात घेतल्यावर पुढे आणखी पाचजण दिसले. त्यांच्याकडून शिकारीचे साहित्य, कुऱ्हाड, पाण्यात टाकण्यासाठी युरिया व इतर साहित्य जप्त करण्यात आले. गत आठवड्यात एक वाघ व वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर व्याघ्र अधिकाऱ्यांनी प्रत्येक पाणवठ्यांची सूक्ष्म तपासणी सुरू केली आहे. रविवारी दुपारी पंचबानजीकच्या पाणवठ्याजवळ एक सर्पगरुड मृतावस्थेत आढळून आल्याने त्या पाणवठ्याचे पाणी तपासण्यात आले. त्यात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. इतर प्राण्यांनी ते विषयुक्त पाणी पिऊ नये यासाठी पाणवठा स्वच्छ करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)