‘एमपीएससी’ पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 02:53 AM2021-04-09T02:53:05+5:302021-04-09T02:53:22+5:30
काही परीक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू; ११ एप्रिलला ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा
पिंपरी (पुणे) : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. समाजमाध्यम आणि सरकारकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे.
एमपीएससीतर्फे येत्या ११ एप्रिल रोजी ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहींचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेश, बिहारने विविध खात्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय जल मार्ग विभागाने नॅव्हिगेशनल असिस्टंट व टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा पुढे ढकलण्याची असल्याचे निवेदन एमपीएससी समन्वय समितीने राज्य सरकारला दिले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर ‘हॅश टॅग पोस्टपोंड एमपीएससी’ अशी मोहीम सुरू केली आहे.
मार्चमध्ये झालेल्या परीक्षेनंतर अनेकांना कोरोना झाला. काहींचे आई, वडील, बहीण, आप्त कोरोनाबाधित आहेत. अनेक जण ११ एप्रिलची परीक्षा देता यावी यासाठी अंगावर आजार काढत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी.
- निकिता शिरिते, विद्यार्थी
माझ्या रूममधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही मुली आजारी आहेत. जवळपास तीस टक्के मुले आजारी आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी.
- सारिका चोले, विद्यार्थी
ट्विटर प्रतिक्रिया
सद्यस्थिती लक्षात घेऊन ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.
- कमलाकर शेटे
राज्यात तीस टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास आमचे व आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो.
-दीपेश मोरे, विद्यार्थी