विद्यार्थी सायबर गुन्हेगारीत
By Admin | Published: May 18, 2015 03:48 AM2015-05-18T03:48:45+5:302015-05-18T03:48:45+5:30
सायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत.
वीरेंद्रकुमार जोगी, नागपूर
सायबर गुन्हेगारीचे लोण आता तरुणांपुरते मर्यादित राहिले नसून माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थीही त्यात अडकू लागले आहेत. १८ वर्षांखालील अल्पवयीन गुन्हेगारांवर कोणत्या नियमानुसार कारवाई करावी याबाबत कोणतीही तरतूद माहिती तंत्रज्ञान कायद्यात नाही. सायबर गुन्हेगारीत आरोपी म्हणून १८ वर्षांहून कमी वय असलेल्यांचा जरी समावेश असला तरी देखील त्यांच्यावर कारवाई करण्यातच आली नसल्याचे धक्कादायक वास्तव इंडियन सायबर आर्मीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
सोशल मीडियावर भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. भारतात २०१४ साली २ कोटी ४३ लाख इंटरनेट युजर्स होते, त्यापैकी १ कोटी ६ लाख वापरकर्ते दररोज सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे समोर आले. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणे सोपे झाले आहे. आयटी अॅक्ट २००० नुसार कोणत्याही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे. मात्र आॅपरेटर्स १३ वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही व्यक्तीला सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्यास परवानगी देते.
सर्वांत जास्त सायबर गुन्हेगार १८ ते ३० वयोगटातील असल्याचेही अहवालातून समोर आले आहे. सोशल मीडिया वापराबाबतचे कायदे व सोशल मीडिया आॅपरेटर्सचे नियम वेगवेगळे असल्याने एक नवीनच सामाजिक समस्या निर्माण झाली आहे.
स्क्रिप्ट किडिंग
सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अधिकाधिक मित्र करता यावेत यासाठी पासवर्ड कसा ब्रेक करावा याचे धडे विद्यार्थी मिळवित असतात. अनेक सर्च इंजिनवर ही माहिती उपलब्ध आहे. यामुळे माहिती मिळवून पासवर्ड ब्रेक करणे सोपे होते. पासवर्ड ब्रेक झाल्याने ते अकाऊंट सर्वांसाठी खुले होते व सहजपणे हाताळता येते. या पद्धतीला ‘स्क्रिप्ट किडिंग’ म्हटले जाते. भारतात यावर पूर्णत: बंदी आहे.
भारतीय आयटी अॅक्ट २००० नुसार सोशल मीडियावर वापर करणाऱ्याचे वय कमीत कमी १८ वर्षे असावे. आॅपरेटर्सच्या नियमावलीनुसार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होण्याचे वय हे त्यातुलनेत साधारणपणे पाच वर्षांनी कमी आहे.
नियम सर्वत्र सारखे हवे
लॅपटॉप, स्मार्टफोनच्या वापर वाढल्याने सायबर गुन्हे वाढले आहे. स्मार्टफोनवरून सोशल मीडियाचा वापर वाढल्याने ते सहजतेने हॅक करता येते. जगात इंटरनेट सर्वत्र सारख्याच पद्धतीने वापरले जात असल्याने त्याचे नियमही सारखे असावेत, अशी माहिती इंडियन सायबर आर्मीचे संचालक अमेय बावणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.