विद्यार्थी गाइड्स, नोट्सपासून वंचित; बालभारतीच्या धोरणावर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 01:49 AM2018-06-06T01:49:41+5:302018-06-06T01:49:41+5:30
यंदा राज्यातील लाखो विद्यार्थी गाइड्स, नोट्स आदी पूरक साहित्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. बालभारतीने प्रकाशकांवर परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकाशक सदर शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणार नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप प्रकाशक संघटनेने केला आहे.
मुंबई : यंदा राज्यातील लाखो विद्यार्थी गाइड्स, नोट्स आदी पूरक साहित्यापासून वंचित राहण्याची भीती आहे. बालभारतीने प्रकाशकांवर परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने प्रकाशक सदर शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणार नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप प्रकाशक संघटनेने केला आहे.
आतापर्यंत बालभारतीच्या पुस्तकांवर आधारित मजकूर कुणीही तयार करू शकत असे. असा मजकूर प्रकाशित करताना फक्त बालभारतीला आवश्यक तेथे श्रेय देणे आणि बालभारतीच्या मूळ मजकुरात काही बदल न करणे अपेक्षित होते. मात्र बालभारतीने आपल्या पुस्तकांसाठी आता स्वामित्व हक्क घेतले असून त्यासाठी परवाना पद्धत अमलात आणण्याची घोषणा केली आहे. बालभारतीने हा निर्णय प्रकाशकांना विश्वासात न घेता, अपारदर्शकपणे, घाईघाईत घेतल्याचा आरोप प्रकाशक संघटनांनी केला आहे.
प्रकाशक व वितरण संघटनेचे सचिव दीपक शेठ यांनी सांगितले की, बालभारतीने परवाना शुल्क आकारले तर याचा खर्च १५ ते २५ रुपयांनी वाढून तो भार पालकांवर पडेल. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी तसेच गैरव्यवहार टाळण्यासाठी या प्रक्रियेत आॅटोमेशन आणावे, शुल्क वाजवी असावे, अशा मागण्या प्रकाशक संघटनेने केल्या.