विद्यार्थी मुकणार नोकर्यांना
By admin | Published: May 19, 2014 03:07 AM2014-05-19T03:07:03+5:302014-05-19T03:07:03+5:30
मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत जाहीर होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांवर आपली नोकरी गमविण्याची वेळ आली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर सातच्या विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनाचा निकाल वेळेत जाहीर होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांवर आपली नोकरी गमविण्याची वेळ आली आहे. पुनर्मूल्यांकनाच्या निकालातील गोंधळ अद्याप सुरूच असल्याने विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर ८च्या परीक्षेवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. इंजिनीअरिंगच्या सेमिस्टर ७चा निकाल विद्यापीठाने खूपच उशिरा जाहीर केला. उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात असंख्य चुका झाल्याचे समोर आले. निकालाची सत्यता पडताळण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले. मात्र, पुनर्मूल्यांकनावेळी विद्यार्थ्यांना अनेक कटू अनुभव आले. विद्यार्थ्यांचे निकाल तीन ते चार वेळा वेगवेगळे आले. यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून प्लेसमेंट देण्यात आली आहे; तर काही विद्यार्थी एक वर्षापूर्वीच नोकरी करत आहेत. नोकरी टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांना सेमिस्टर ७चा निकाल सादर करणे महत्त्वाचे आहे. परंतु विद्यापीठाच्या सेमिस्टर ७च्या निकालात असंख्य चुका झाल्याने अनेक विद्यार्थ्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. इंजिनीअरिंगच्या काही विद्यार्थ्यांची परीक्षा चार दिवसांनंतर सुरू होत आहे. तरीही सेमिस्टर ७चा पुनर्मूल्यांकनाचा निकाल हाती न आल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत. परीक्षेचा अभ्यास करायचा की निकालाची चौकशी करण्यासाठी रोज विद्यापीठात हेलपाटे मारायचे, असा सवाल विद्यार्थी करत आहेत. निकालात दुरुस्ती करण्यासाठी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना सोमवारची डेडलाइन दिली आहे.