अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे विद्यार्थी संघटनांकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 06:57 PM2020-06-01T18:57:07+5:302020-06-01T18:59:02+5:30
परीक्षा रद्दचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणारा असून कायद्याच्या चौकटीत टिकणारा नाही, अशीही भूमिका विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त..
पुणे : अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचे बहुतांश विद्यार्थी संघटनांनी स्वागत केले आहे. मात्र, परीक्षांसंदभार्तील शासन निर्णयात अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे स्वायत्त महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जात आहेत. तर परीक्षा रद्दचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला घालणारा असून कायद्याच्या चौकटीत टिकणारा नाही, अशीही भूमिका विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परीक्षेवरील शासन निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अपेक्षित आहे. परंतु,राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत केले जात आहे. मात्र, शासन निर्णयात अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे पुणे शहरातील काही स्वायत्त महाविद्यालयांकडून अजूनही ऑनलाइन पद्धतीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबतही अद्याप स्पष्टता नाही. तसेच हा निर्णय गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाºया विद्यार्थ्यांसाठी दुदैर्वी असून, विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारा आहे, असेही मत विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केले जात आहे.
------
शिक्षण विभागाच्या निर्णयाने सुमारे नऊ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन घेतलेला हा निर्णय देशातील इतर राज्येही घेतील. ज्यांना परीक्षा द्यायची, त्यांनाही परीक्षा देता येणार आहे. परगावी असणाºया विद्यार्थ्यांना परीक्षा देणे शक्य झाले नसते, त्यामुळे राज्यातील; तसेच परराज्य व परदेशातील विद्यार्थ्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळेल.
- किरण साळी, उपशहरप्रमुख, शिवसेना
----------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने योग्य निर्णय घेतला आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होईल. परीक्षा महत्त्वाच्या असल्याने ज्यांना परीक्षा द्यायची, त्यांना परीक्षा देण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.
-अक्षय जैन, राष्ट्रीय संघटक, एनएसयुआय
-------------------------
कोणत्याही परीक्षा जिवापेक्षा मोठ्या नाहीत. कोरोना संसगार्चा धोका निर्माण होईल, अशा कोणत्याही गोष्टींची सक्ती योग्य नाही. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना संसर्ग झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे राज्य शासनाने परीक्षा रद्द करून विद्यार्थी हिताचा निर्णय घेतला आहे.
ऋषी परदेशी- प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.
-----------------
बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांबाबत आणि स्वायत्त ऑटोनॉमस महाविद्यालयांना हा निर्णय बंधनकारक आहे का, यावर शासनाच्या धोरणात स्पष्टता नाही. काही स्वायत्त महाविद्यालयांच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे शासनाने सरसकट अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात.
-कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना,
-----
अंतिम वर्षाची परीक्षा न घेण्याचा राज्य शासनाचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विद्यापीठ कायदा 2016 नुसार हा निर्णय जाहीर करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का? हा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार न टिकणारा आहे. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय दुर्दैवी असून विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घाला घालणारा आहे.- अनिल ठोंबरे ,अभाविप,महानगर मंत्री, पुणे
..................