अजित पवार कॉलेजमधील विद्यार्थी दुसऱ्या कॉलेजमध्ये
By admin | Published: May 25, 2017 02:10 AM2017-05-25T02:10:22+5:302017-05-25T02:10:22+5:30
बोरीवली येथील नामदार अजित पवार ज्युनियर महाविद्यालयात गेल्या वर्षी अकरावीला प्रवेश घेतलेल्या ४८५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरीवली येथील नामदार अजित पवार ज्युनियर महाविद्यालयात गेल्या वर्षी अकरावीला प्रवेश घेतलेल्या ४८५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. या सर्व विद्यार्थ्यांना जवळच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येईल. यासंदर्भात पुढच्या दोन दिवसांत महाविद्यालयांची यादी निश्चित करण्यात येणार असून, तत्काळ प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना बुधवारी दिले.
अकरावी प्रवेश आॅनलाइन पद्धतीने सुरू असतानादेखील क्लासच्या मदतीने आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना अजित पवार ज्युनियर महाविद्यालयात प्रवेश देण्यात आले. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा आॅनलाइन तपशील संबंधित महाविद्यालयाने भरला नाही. त्यामुळे प्रत्येक फेरीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. अशा प्रकारे या महाविद्यालयात तब्बल ४८५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. परंतु, या विद्यार्थ्यांची नोंदच करण्यात आली नाही. प्रकरण पोलिसात दाखल झाल्यावर शिक्षण विभागाने या महाविद्यालयाची मान्यता रद्द केली. त्यामुळे महाविद्यालयात अधिक शुल्क भरून प्रवेश घेतलेल्या ४८५ विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पालकांवर संकट कोसळले होते.
या प्रकरणी बुधवारी दुपारी पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षक उपसंचालकांची भेट घेतली. त्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल. गुरुवारी एक बैठक घेण्यात येणार असून, त्यानंतर महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांना जवळचे महाविद्यालय निवडण्याची संधी देण्यात येईल, असे शिक्षण उपसंचालक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
२६ मेपर्यंत पोलीस कोठडी
नामदार अजित पवार ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिकणाऱ्या जवळपास ७६ विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा चारकोपच्या खासगी क्लासमध्ये घेतल्याप्रकरणी सोमवारी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत गायकवाड व क्लासचालक मकरंद गोडस यांना चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. दोघांंना अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
गायकवाडला सहामाही परीक्षेतच हा सगळा प्रकार लक्षात आला होता. मात्र त्याने वार्षिक परीक्षेवेळी ही तक्रार केली. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला त्याची मूक संमती असल्याचे सिद्ध होत असल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या या दोघांचीही पोलीस कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या दोघांना कडक शिक्षा व्हावी, अशी पालकांची मागणी आहे.