पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:46 AM2020-05-14T10:46:50+5:302020-05-14T10:49:11+5:30
विद्यार्थी संख्येच्या तुलनेत समुपदेशन केंद्रांची संख्या खूपच कमी असल्यामुळे समुपदेशकांवर कामाचा ताण
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार असून त्यासाठी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालय व संस्थांनी 'परीक्षा मार्गदर्शन समिती' ची स्थापना करावी, असे निर्देश विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिले आहेत.
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी पुणे, अहमदनगर व नाशिक या तीनही जिल्ह्यात समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत समुपदेशन केंद्रांची संख्या खूपच कमी असल्यामुळे या केंद्रांवरील समुपदेशकांवर कामाचा ताण येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता विद्यापीठाशी संलग्न प्रत्येक महाविद्यालयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांकडूनही परीक्षेसंदभार्तील माहिती जाणून घेता येणार आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षा कोणत्या पद्धतीने होणार, प्रथम वर्षातील बॅकलॉग च्या विषयांची परीक्षा केव्हा होणार, परीक्षा अर्ज भरायचा राहून गेला आहे, त्यासाठी काय करावे लागणार असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना पुढील काही दिवसात सहज मिळवता येतील.
विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेता सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी मार्गदर्शन त्वरित मिळावे, यासाठी प्रत्येक महाविद्यालयात 'परीक्षा मार्गदर्शन समिती'ची स्थापना करावी. या समितीमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा शैक्षणिक संस्थेचे संचालक, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी, सदस्य सचिव तसेच इतर तीन ते दहा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश या समितीमध्ये करावा. त्याचप्रमाणे स्थापन केलेल्या समितीची माहिती महाविद्यालयांनी व शैक्षणिक संस्थांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही याबाबत अवगत करावे. महाविद्यालयांनी आपल्या क्षेत्रात येणाऱ्या नोडल महाविद्यालयातील मार्गदर्शन व समुपदेशन केंद्राशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल, याबाबत दक्षता घ्यावी. 'परीक्षा मार्गदर्शन समितीला' काही अडचणी आल्यास त्यांनी नोबल महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.