फी न भरल्याने विद्यार्थ्यांना बसविले वर्गाबाहेर
By admin | Published: July 4, 2016 06:19 PM2016-07-04T18:19:12+5:302016-07-04T18:19:12+5:30
दसनूर, ता.रावेर येथील उमेश्वर पूर्व प्राथमिक विद्यामंदिर या इंग्रजी शाळेने विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने त्यांना चक्क वर्गा बाहेर बसविण्यात आले.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ऑनलाइन लोकमत
निंभोरा, दि. ४ : दसनूर, ता.रावेर येथील उमेश्वर पूर्व प्राथमिक विद्यामंदिर या इंग्रजी शाळेने विद्यार्थ्यांनी फी न भरल्याने त्यांना चक्क वर्गा बाहेर बसविण्यात आले.त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
उमेश्वर विद्या मंदिरात नर्सरी ते चौथीपर्यंत इंग्लिश मीडियमचे वर्ग आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेश फी न भरल्यामुळे वर्ग न भरवता काही विद्यार्थ्यांना प्रवेश न देता त्यांना वर्गाबाहेर बसविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. काहींना जेव्हा फी भराल तेव्हाच या अशी वागणूक विद्यामंदिरचे चेअरमन मधुकर नारायण महाजन यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना पूर्व सूचना न देता शाळेतून हाकलून देऊन त्यांना अपमानिकत केले. काही विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ४ हजार ५०० रु. तर काहींकडून ५ हजार रु. प्रवेश फी घेतली जात आहे. वेळेत प्रवेश फी शक्य होत नसल्याने विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना बाहेरच बसविले जात आहे. यामुळे कोवळ्या मनावर एकप्रमाणे आघात करण्यात येत आहे. संबंधितांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली असता चेअरमन यांना शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रवेश फी साठी शाळेबाहेर बसवू नका, अशी सूचना करण्यात आहे. परंतु तरी देखील चेअरमन विद्यार्थ्यांना वर्गात न बसू न देता त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून शासनाच्या सर्व शिक्षण अभियानाला फाटा दिला जात आहे. याबाबत चेअरमन यांच्या कारभाराची त्वरित चौकशी व्हावी अन्यथा ११ जुलै रोजी रावेर येथील गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरपीआय गवई गटचे तालुका अध्यक्ष विवेक तायडे व दसूनूर येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिला आहे.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
याबाबतचे निवेदन शिक्षणमंत्री विनोद तावडे, शिक्षण उपसंचालक नाशिक, जिल्हाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी जळगाव, जि.प. शिक्षण सभापती, गटशिक्षण अधिकारीे, तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)