सोलापुरात दुर्लक्षामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा !
By admin | Published: January 5, 2015 04:26 AM2015-01-05T04:26:39+5:302015-01-05T04:26:39+5:30
अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या
करमाळा : अस्वच्छ स्वयंपाकगृह, दूषित पाणीपुरवठा, खराब तांदूळ याकडे कोर्टीच्या शिवाजी विद्यालयाच्या शालेय पोषण आहार समितीच्या व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्यानेच तब्बल ११५ विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली आहे, अशी फिर्याद गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मुख्याध्यापकासह माध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विद्यार्थी विषबाधा प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी म्हटले आहे की, माध्यान्ह भोजन बनविलेले ठिकाण, धान्याची पाहणी केली असता ही ठिकाणे अस्वच्छ असल्याचे आढळले. तांदळाला उग्रवास येत होता तर इतर कडधान्यात थोडीशी पांढरी भुकटी दिसून आली. बनविण्यात आलेल्या भातासही उग्र्र वास येत होता. अन्न बनविण्यासाठी ज्या टाकीतून पाणी वापरले जाते त्याची पाहणी केली असता टाकीच्या तळाशी शेवाळे तसेच कापडाच्या चिंध्या कुजलेल्या अवस्थेत दिसून आल्या. याला विद्यालयाचे मुख्याध्यापक व स्वयंपाकी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक छगन रामभाऊ माने व अन्न शिजवणारे गणेश जालिंदर अभंग, अश्विन गणेश अभंग, काशीबाई गणेश अभंग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे.